काँग्रेस पक्षाची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच , पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:32 AM2018-06-27T06:32:12+5:302018-06-27T06:32:15+5:30

काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेतच वावरत आहे. निवडणुकीतील पराभव पचनी न पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे.

The ideology of the Congress party is still in crisis, the criticism of the Prime Minister | काँग्रेस पक्षाची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच , पंतप्रधान मोदी यांची टीका

काँग्रेस पक्षाची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच , पंतप्रधान मोदी यांची टीका

Next

मुंबई : काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेतच वावरत आहे. निवडणुकीतील पराभव पचनी न पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे. जेव्हा-जेव्हा गांधी घराण्याला सत्ता जाण्याची भीती वाटते, तेव्हा-तेव्हा भीतीचे वातावरण असल्याची हाकाटी पिटली जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढविला.
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्यानिमित्त कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आणीबाणी हे काँग्रेसचे पाप आहे. एका कुटुंबाच्या स्वार्थासाठी राज्यघटनेचा दुरुपयोग करून, आणीबाणी लादण्यात आली. सत्तेपोटी स्वत:च्या पक्षाचे तुकडे करून देशाचा कैदखाना करण्यात आला. आणीबाणीनंतरही काँग्रेसची मानसिकता बदलली नाही. काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. एकाच कुटुंबाची सत्ता हेच काँग्रेसचे धोरण आहे. सत्ता गेल्याचे दु:ख काँग्रेस पचवू शकली नाही. त्यामुळेच पद्धतशीरपणे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे.
आणीबाणीनंतर लोकांनीच लोकशाही जगवली. लोकशाहीवरील निष्ठा मजबूत राहावी, यासाठी आणीबाणीचा अध्याय विसरता कामा नये. आजच्या व पुढच्या पिढीला जागरूक करण्यासाठी आणीबाणीतील दिवसांचे स्मरण आवश्यक असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या विरोधात असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढ्याचा विजय हा लोकशाही व भारतीय राज्यघटनेचा विजय आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हजर होते.

कुलदीप नायर यांना सलाम
पत्रकार कुलदीप नायर यांनी आणीबाणीला जोरदार विरोध केला होता, याची आठवण सांगून मोदी म्हणाले की, आज नायर हे भाजपाचे कट्टर विरोधक आहेत. तरीही मला त्यांच्याविषयी आदर आहे. त्यांना माझा सलाम!

एकाधिकारशहा पंतप्रधान व उद्दाम सरकारमुळेच राज्यघटना धोक्यात
देशात आणीबाणी लादण्यावरून काँग्रेसवर लोकशाही व राज्यघटनेच्या गळचेपीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजवटीतच घटनात्मक लोकशाही संस्थांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे, असे खरमरीत प्रत्युत्तर काँग्रेसने मंगळवारी दिले.

अपयश झाकण्यासाठी खटाटोप - पवार
नरेंद्र मोदी यांना ४ वर्षांतील आपल्या अपयशावरून लक्ष हटविण्यासाठी तब्बल ४३ वर्षांनी आणीबाणीची आठवण होत आहे, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

देशाचे त्यांना काही नाही
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्याला कधी न्यायालयात उभे राहावे लागेल, जामीन घ्यावा लागेल, याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास न दाखविता सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला गेला. आणीबाणी व महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता आहे. काँग्रेसला देश, परंपरा, लोकशाही यांचे काहीच वाटत नाही.

आणीबाणीच्या काळात प्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांना एका कार्यक्रमात गाण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यांनी त्यास नकार दिल्यावर, त्यांची गाणी आकाशवाणीवरून ऐकविणेही बंद करण्यात आले. किशोर कुमार यांचा गुन्हा तरी काय होता? असा सवाल करतानाच 'आँधी' चित्रपटालाही त्या वेळी विरोध करण्यात आल्याची आठवण मोदी यांनी सांगितली.

निष्कारण बागुलबुवा
केला जात आहे
देशात अनेक निवडणुका झाल्या, अनेक सरकारे आली, पण कोणी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत ४०० वरून ४० वर आल्यानंतर त्यांना निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा साक्षात्कार झाला. कर्नाटक निवडणुकीनंतर त्यांना ईव्हीएमची आठवण का झाली नाही, अशी कोपरखळीही मारून पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मुस्लिमांना टार्गेट करेल, याचा बागुलबुवा काँग्रेसने उभा केला. दलित संकटात असल्याची भीती दाखविली जात आहे. ज्यांनी राज्यघटनेचे रक्षण केले नाही, तीच मंडळी आज मोदी घटनेला नख लावण्यात आल्याचा अपप्रचार करीत आहेत.

Web Title: The ideology of the Congress party is still in crisis, the criticism of the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.