दरमहा 500 रुपयांची बचत करुन श्रीमंत कसे व्हायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:08 PM2018-08-28T12:08:35+5:302018-08-28T17:08:24+5:30

नुकत्याच नोकरीला लागलेल्या किंवा उद्योग सुरु करणाऱ्या माणसानेही सुरुवातीपासून किमान 500 रुपयांपासून सुरुवात केली पाहिजे. आता केवळ 500 रुपयांपासून आपण गुंतवणूक कोठे करु शकतो ते पाहू.

How to become rich by saving 500 rupees per month? | दरमहा 500 रुपयांची बचत करुन श्रीमंत कसे व्हायचे?

दरमहा 500 रुपयांची बचत करुन श्रीमंत कसे व्हायचे?

मुंबई- 1 तारखेला मिळणाऱ्या पगारातून महिन्याभराचा खर्च भागवणे सर्वसामान्यांना अगदी कठिण जाते. सर्व प्रकारची बिले, शाळा-कॉलेजची फी भरणे, पेट्रोलचा खर्च यामध्ये मध्यमवर्गाची दमछाक होते. मात्र महिन्यातून केवळ 500 रुपये बाजूला काढून साठवण्याची सवय तुम्हाला लागली तरी भविष्यातील अनेक प्रश्नांची सूटका त्यातून होऊ शकते. महिन्याला 500 ही रक्कम लहान वाटत असली तरी दरमहा 500 म्हणजे वर्षाला तुम्ही 6000 रुपये बाजूला काढत असता. हे प्रतीमहिना 500 रुपये बाजूला काढणे हे गुंतवणूक व सेव्हींगचा संस्कार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नुकत्याच नोकरीला लागलेल्या किंवा उद्योग सुरु करणाऱ्या माणसानेही सुरुवातीपासून किमान 500 रुपयांपासून सुरुवात केली पाहिजे. आता केवळ 500 रुपयांपासून आपण गुंतवणूक कोठे करु शकतो ते पाहू.

1) म्युच्युअल फंड-  म्युच्युअल फंड ही गुंतवणूक कोणा दुसऱ्यांसाठी आहे, आपली ती वाट नाही. असा समज बहुतांश लोकांचा असतो. त्यामध्ये केवळ श्रीमंत लोक पैसे गुंतवू शकतात असे लोकांना वाटते. मात्र म्युच्युअल फंडात प्रतिमहा 500 रुपये गुंतवण्याची एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन योजनेतून तुम्ही पैसे गुंतवू शकता. इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड आणि गोल्ड स्कीममधून तुम्ही पैसे गुंतवू शकता. तुम्ही ज्या क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत त्याच्या वाढीनुसार तुम्हाला फायदा मिळत जातो. दरमहा 500 रुपये 20 वर्षांसाठी गुंतवत गेल्यास जर सरासरी 10 टक्के वार्षिक व्याज मिळत राहिले तर मुदत संपल्यावर तुम्हाला 3.8 लाख रुपये मिळू शकतात.




2) अटल पेन्शन योजना- या योजनेमध्ये तुम्हाला प्रतिमहा महिन्याला 1000, 2000, 3000, 4000, 5000 असे पेन्शन मिळू शकते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे पेन्शन मिळते. तुमच्या प्रतिमहा बचतीनुसार पेन्शनचा आकडा ठरतो. वयाच्या 25 ते 30 या वर्षांमध्ये दरमहा 300 ते 500 रुपये गुंतवल्यास वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 5000 रुपये पेन्शन तुम्हाला मिळू शकते. जर गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळते व दोघांचेही निधन झाल्यास त्यांच्या वारसदाराला रक्कम मिळते.

3) पीपीएफ- पब्लिक प्रॉव्हीडंट फंड अत्यंत लोकप्रिय योजना आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, बचतीसाठी हा अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. चांगल्या व्याजदरामुळे याला पसंती मिळते. गुंतवणूकदार प्रतीमहिना 500 रुपये यामध्ये गुंतवू शकतो. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकता. खात्रीशीर व्याज देणारा आणि सुरक्षित पर्याय तसेच तरुण मुला-मुलींनी बचत सुरु करण्यास प्रारंभीच्या टप्प्यात पीपीएफचा पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरु करता येईल तितके चांगले फायदे आपल्याला मिळतात.

भविष्य सुरक्षित करण्यासाठी 5 उपाय; महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे




4) एफडी आणि आरडी- फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट हा एक बचतीचा, गुंतवणुकीचा परंपरागत पर्याय आहे. रुपये 100 पासून बचत करण्याची संधी यामध्ये मिळते. काही बँकांच्या योजनांमध्ये किमान 500 रुपयांची बचत करावी लागते. कायम ठेवीवरील व्याजदर 6.5 टक्के ते 7.25 टक्के यांमध्ये असते. बँकांनुसार यामध्ये बदल असतो. त्याचप्रमाणे रिकरिंग डिपॉझिटमुळे बचतीची चांगली सवय लागते.

नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा...

5) पोस्टाच्या योजना- तुम्ही अगदीच थो़डे पैसे बाजूला काढू शकत असलात तरीही काळजी नाही. पोस्टाच्या योजना आपल्या मदतीसाठी आहेत. पोस्टाच्या कार्यालयात तुम्ही केवळ 20 रुपये ठेवून बचत खाते काढू शकता. तसेच तुम्हाला चेकबूक हवे असल्यास खात्यामध्ये किमान 50 रुपये ठेवावे लागतात. 5 वर्षांच्या आरडी योजनेमध्ये तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे एनएससी केवळ 100 रुपयांनी उघडता येते. 100च्या पटीमध्ये तुम्हाला यामध्ये कितीही बचत करता येऊ शकते. खात्रीशीर व्याज व परताव्यासाठी तुम्ही याचा विचार करु शकता.

तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?



 

Web Title: How to become rich by saving 500 rupees per month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.