'चौकीसमोर गांजा मिळतो', विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांनाच दाखवला आरसा, Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:27 PM2024-03-08T21:27:23+5:302024-03-08T21:28:06+5:30
अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांची पोलखोल केली.
Sonipat News: पोलीस अनेकदा अमली पदार्थांविरोधात कारवाई केल्याचा दावा करतात, पण काहीवेळा त्यांचे दावे फोल ठरतात. अशीच एक घटना हरियणाच्या सोनीपतमधून समोर आली आहे. येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांची पोलखोल केली. विद्यार्थ्याने थेट डीसीपींना आरसा दाखवला.
चार विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले
गुरुवारी पोलिसांनी सोनीपतच्या राय एज्युकेशन सिटीमध्ये असलेल्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जागरुक करण्यासाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, अशोका युनिव्हर्सिटी, एसआरएम युनिव्हर्सिटी आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, या चार प्रसिद्ध विद्यापीठांमधून विद्यार्थी आले होते. या सेमिनारला डीसीपी सतीश कुमार आणि इतर पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्याचे सेवन न करण्याचे आवाहन केले. यावेळी एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने थेट पोलिसांना गोत्यात आणले.
#Sonipat में पुलिस के नशा मुक्ति के एक कार्यक्रम में एक युवा ने खोली @SonipatPolice की पोल pic.twitter.com/wBYkakL5HH
— POOJA TRIPATHI (@shalki_pj) March 8, 2024
काय म्हणाला तो विद्यार्थी?
पोलिसांसमोर विद्यार्थ्याने सांगितले की, 'इथे अनेक मुले ड्रग्ज विक्री करणाऱ्याला शोधतात आणि त्यांच्याकडून ड्रग्स घेतात. मुलांना ड्रग्सवाले सापडतात, मग पोलिसांना हे सर्व का दिसत नाही? आमच्या विद्यापीठासमोर पोलिस चौकी असून खुलेआम गांजाची विक्री केली जाते. गांजा किंवा इतर मादक पदार्थ मिळवणे चॉकलेट मिळवण्यासारखे सोपे आहे. हे पोलिसांचे अपयश आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?' विद्यार्थ्याचे बोलणे ऐकून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्याला समर्तन दर्शवले. पोलिसांची पोलखोल करणाऱ्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.