धक्कादायक! ऑनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 09:18 AM2018-10-12T09:18:46+5:302018-10-12T09:51:07+5:30

पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यानेच आपल्या आई, वडिल आणि बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

Delhi Teen Who Killed Family Was Addicted To An Online Game, Say Police | धक्कादायक! ऑनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

धक्कादायक! ऑनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

googlenewsNext

नवी दिल्ली - ऑनलाईन गेम्सच्या नादापायी एका 19 वर्षीय मुलाने आपल्या कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने कुटुंबियांची हत्या केल्यानंतर सुरुवातीला चोरी झाल्याचा बनाव करत सर्वांना फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यानेच आपल्या आई, वडिल आणि बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज वर्मा असं अटक करण्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी सूरजला याप्रकरणी अटक केली आहे. आईवडिलांची हत्या केलेल्या सूरजला त्याच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप होत नाही. उलट तो पोलिसांना 'मला कायद्यापासून वाचवा' असं सांगत आहे. आई-वडिलांकडून अभ्यास न केल्याबद्दल तसेच कॉलेजात न जाण्यावरुन सारखा ओरडा मिळत होता. तसेच ऑनलाईन गेम्स खेळण्याची आवड आहे. मात्र कुटुंबिय त्यावरून सारखे वाद घालत असे. या सगळ्या गोष्टीला कंटाळूनच त्यांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.  

पोलिसांनी केलेल्या तपासात सूरजचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप होता. त्यामध्ये त्याचे 9 ते 10 मित्रमैत्रिणी आहेत. या ग्रुपमध्ये ते नेहमीच कॉलेजला न जाणं, फिरणं, मौजमजा करणं, ऑनलाईन गेम्सबाबत चर्चा करत असल्याचं समोर आलं. तसेच सूरजने या सर्व गोष्टी करता याव्यात यासाठी एक घर भाड्याने घेतलं होतं. तिथे तो त्याच्या मित्रांसोबत संपूर्ण दिवस ऑनलाईन गेम खेळत असे. कॉलेजला न जाता तो तिथे केवळ गेम्सच्या दुनियेत तल्लीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

15 ऑगस्टला पतंग उडवण्यात वेळ वाया घालवण्यावरुन सूरजला कुटुंबियांचा ओरडा मिळाला होता. त्याचे वडील मिथिलेश यांनी त्याला त्यावरून मारहाण ही केली होती. त्यामुळच संतापलेल्या सूरजने  आपल्या कुटुंबाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. सूरज आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. तेथून घरी परतताना त्याने त्याच्यासोबत चाकू आणि काही गोष्टी आणल्या. त्याच संध्याकाळी त्याने संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवला. 

आपल्या कुटुंबियांच्या फोटोचा अल्बमही सूरजने पाहिला. मात्र त्यानंतर पहाटे तीन वाजता सूरज उठला आणि थेट आई-वडिलांच्या खोलीत शिरला. त्याने आधी आपल्या 44 वर्षीय वडिलांच्या छाती आणि पोटात चाकूने वार करण्यास सुरुवात केली. ओरडण्याचा आवाज ऐकून आई जागी झाली आणि तिला हा प्रकार पाहून धक्काच बसला. आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण सुरजने तिच्यावरही वार करत तिची हत्या केली. यानंतर तो आपल्या बहिणीच्या खोलीत गेला आणि तिच्या गळ्यावर वार करत तिचीही निर्घृण हत्या केली. 

हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी सूरजने घरातील सामान पसरवून ठेवले. हत्येसाठी वापरलेल्या चाकूवरील डागही मिटवले. काही तासांनी त्याने त्याच्या शेजाऱ्यांना आपल्या कुटुंबाची हत्या झाली असल्याचं सांगितलं. तसेच घरात चोरी झाल्याचा दावाही त्याने केला. घरातील मौल्यवान वस्तूची चोरी झाली नसल्याने पोलिसांना सूरजवर संशय आला. त्यांनी याप्रकरणी सूरजची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुटुंबियांची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. 
 

Web Title: Delhi Teen Who Killed Family Was Addicted To An Online Game, Say Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.