दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:25 PM2024-04-11T17:25:38+5:302024-04-11T17:26:08+5:30

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Delhi Excise Policy: noose for 'these' leaders; So far 16 people have been arrested | दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक

दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक

CBI Arrested K Kavitha: दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्यामुळे आम आदमी पक्ष (AAP) अडचणीत आला आहे. याप्रकरणी आपचे अनेक नेते तुरुंगात आहेत. अशातच, सीबीआयने गुरुवारी (11 एप्रिल) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस नेत्या के. कविता यांनाही अटक केली. विशेष म्हणजे, यापूर्वी कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि ED ने दिल्ली मद्य धोरणाबाबत गुन्हा दाखल केला असून, या धोरणाचा वापर करुन मनी लाँड्रिंग करण्यात आली का, याचा तपास ईडी करत आहे. 

अरविंद केजरीवाल
याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना गेल्या महिन्यात ईडीने त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर झडती घेतल्यानंतर अटक केली होती. पक्षाचे संपर्क प्रभारी विजय नायर हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने काम करत असल्याचा आरोप या एजन्सींनी केला आहे.

के कविता
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या आणि भारत राष्ट्र समिती (BRS) च्या विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांनाही गेल्या महिन्यातच ईडीने त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. ईडीने कविता, या साउथ लॉबीचा भाग असल्याचा आरोप केला असून, आप नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावाही केला आहे. 

संजय सिंह
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दीर्घ चौकशीनंतर 4 ऑक्टोबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची अटकही या प्रकरणात महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संजय सिंग सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. 

मनीष सिसोदिया
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. 9 मार्च 2023 रोजी ईडीने या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून सिसोदिया यांना पुन्हा एकदा अटक केली. ईडीच्या आरोपपत्रात त्यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मितीमध्ये अतिरिक्त प्रक्रियात्मक सहभागाचा, काही मद्य कंपन्यांच्या फायद्यासाठी त्यात बदल केल्याचा आरोप आहे.

विजय नायर
आपचे संपर्क प्रभारी विजय नायर यांना सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. ईडीने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर आरोप केले होते. ईडीने नायर यांच्यावर ‘साऊथ ग्रुप’चा मध्यस्थ असल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्यावर AAP च्या गोवा विधानसभा प्रचारादरम्यान लाच म्हणून मिळालेल्या पैशांची लाँड्रिंग केल्याचा आरोप केला.

वरील नेत्यांशिवाय, साउथ लॉबीचे सदस्य राघव मंगुटा(या प्रकरणातील माफीचे साक्षीदार), वड्डी रिटेलचे मालक अमित अरोरा, अकाली दलाचे माजी आमदार गौतम मल्होत्रा ​​यांचा मुलगा, अरबिंदो ग्रुपचे प्रवर्तक पी शरद रेड्डी, साऊथ ग्रुपचे सदस्य, अभिषेक बोनपल्ली, बुकीबाबू गोरंटला, रेकॉर्ड इंडियाचे प्रादेशिक प्रमुख बिनॉय बाबू, चौरिएट प्रॉडक्शनचे संचालक राजेश जोशी आणि इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Delhi Excise Policy: noose for 'these' leaders; So far 16 people have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.