आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 04:37 PM2015-12-31T16:37:20+5:302015-12-31T16:37:36+5:30

काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या नरेंद्र मोदींनी आरोपी मंत्र्यांना हटवावे व संसद चालवावी, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

Delete accused ministers and run Parliament - Congress's response to Modi | आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  'काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ' आधी आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसद चालवावी' असे प्रत्युत्तर काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे. संसदीय कामकाज सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी त्यांना आपल्या आरोपी मंत्र्यांना हटवावे लागेल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरणासाठी गुरूवारी नोएडामध्ये आलेल्या मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. गेल्या ६० वर्षांपासून देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा असे मोदी यांनी म्हटवे होते.
मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, ' स्वत:च्या अपयशाचे खापर दुस-यांच्या माथी फोडण्यात मोदीजी माहीर आहेत. पण संसदेत विरोधक गोंधळ का घालतात याबद्दल मोदींनी आत्ममंथन करावे आणि विविध प्रकरणात आरोप लावण्यात आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह , परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरूण जेटली या मंत्र्यांना आधी पदावरून हटवावे.'  संसद सुरळीतपणे चालवण्याचे काम सरकारचे असते आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. पण मोदीजी तर सतत बोलत असतात, कोणाचेही ऐकत तर नाहीतच' अशा शब्दांत सूरजेवाला यांनी मोदींवर टीका केली. संसद ही मर्यादा आणि लोकशाहीच्या मूल्यांवर चालत असते आणि तेथे कोणाचाही अंकुश चालत नाही, असेही सूरजेवाला म्हणाले. 
 
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरण समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. लोकांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, वेगवेगळी मते मांडण्यासाठी आपल्याला निवडून दिले असून ते आपले काम आहे. ज्यांना देशातील जनतेने नाकारले, ते आता गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, संसदेचे कामकाज रोखतात. पण देशातील गरिबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे झालेच पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी येत्या नवीन वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याचा संकल्प करावा, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला. 

Web Title: Delete accused ministers and run Parliament - Congress's response to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.