नवी दिल्ली : शहराच्या ज्या भागात ती राहायची, तेथेच तिने स्वत:ची दहशत निर्माण केली. ती ‘ममा’ नावाने संगम विहारची ‘गॉडमदर’ म्हणून ओळखली जाते. तिने या गुन्हेगारी जगतात आपल्या मुलांनाही आणले. आता मात्र गुन्हेगारी बंद करून शांततेचे आयुष्य जगण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसीरन (६२) हिला आठ मुले आहेत. खून, दरोडे, बेकायदा दारू गाळणे व विकणे आदी ९९ गुन्ह्यांत ते सर्व जण आरोपी आहेत. दिल्लीतील संगम विहार वसाहतीत गुन्हेगारी जगताची गॉडमदर असलेल्या बसीरनची दोन महिन्यांपूर्वी तिहार तुरुंगातून सुटका झाली. तिची काही मुले अद्याप याच तुरुंगात आहेत.
बेकायदा दारू गाळून विकण्याच्या तीन प्रकरणांत बसीरनचे नाव आहे. तिचा मुलगा शमीम गुंगा हा खून आणि दरोड्याच्या आरोपांसह ३८ गुन्ह्यांत आरोपी आहे. शकील आणि वकील नावाची तिची मुले २९ प्रकरणांत सहभागी आहेत, तर राहुल खुनासह तीन प्रकरणांत सहभागी आहे. सनी, सोहिल आणि फैजल ही तिची मुले १७ गुन्ह्यांच्या प्रकरणांत सहभागी आहेत.
बसीरन आणि तिच्या कुटुंबाने अनेक वर्षे अटक टाळली होती, परंतु गेल्या दहा महिन्यांत पोलिसांनी तिच्या कुटुंबावर कारवाई करून, तिला व तिच्या सात मुलांना अटक
केली. आठवा मुलगा अल्पवयीन असून, त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

बसीरनने आता आपली संगम विहार भागातील तीन मजली इमारत (किंमत सुमारे ५० लाख रुपये) विकून दिल्लीबाहेर असलेल्या फरिदाबादेत जायचे ठरविले आहे. तिथे सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितले.