शौर्य ! शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसाने 10 किलोचा बॉम्बगोळा हातात घेऊन घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 10:07 AM2017-08-28T10:07:58+5:302017-08-28T10:08:37+5:30

मध्यप्रदेशातील एका छोट्याशा गावात एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सापडल्यानंतर 40 वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने आपल्या जीवाची पर्वा न करता बॉम्ब हातात घेतला आणि धावण्यास सुरुवात केली

Cop Ran With 10 Kg Bomb On His Shoulder For 1 Km | शौर्य ! शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसाने 10 किलोचा बॉम्बगोळा हातात घेऊन घेतली धाव

शौर्य ! शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसाने 10 किलोचा बॉम्बगोळा हातात घेऊन घेतली धाव

Next

भोपाळ, दि. 28 - मध्यप्रदेशातील एका छोट्याशा गावात एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. पोलीस कर्मचा-याने शौर्याचं प्रदर्शन करत शाळकरी मुलं आणि गावक-यांचा जीव वाचवला आहे. शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सापडल्यानंतर 40 वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने आपल्या जीवाची पर्वा न करता बॉम्ब हातात घेतला आणि धावण्यास सुरुवात केली. मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी बॉम्ब हातात घेऊन जवळपास एक किलोमीटपर्यत धाव घेतली. मानवी वस्तीपासून दूर जाईपर्यंत त्यांनी हा बॉम्ब हातात ठेवला होता. प्रसंगावधान दाखवत आपल्या जीवाची बाजी लावणा-या या धाडसी पोलीस कर्मचा-याचं कौतुक केलं जात आहे. 

भोपाळपासून 170 किमी अंतरावर असणा-या चितोरा गावात ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेच्या मागील परिसरात बॉम्ब आढळला होता. या शाळेत जवळपास 400 हून जास्त मूलं शिकतात. बॉम्ब सापडल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. 

पोलिसांनी बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांच्या नेतृत्वातील पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्बविरोधी पथक नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. शाळा प्रशासनदेखील प्रचंड घाबरलं होतं. कोणाला काय करावं सुचत नसताना हेड कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांनी मोकळ्या हाताने 12 इंचाचा तो बॉम्ब उचलला आणि धावण्यास सुरुवात केली. 10 किलोचा हा बॉम्ब आपल्या खांद्यावर घेऊन ते धावत सुटले. 

'100 नंबरवर फोन आल्यानंतर आम्हाला घटनेची माहिती मिळाली होती. शाळेचं कम्पाऊंड आणि रहिवासी परिसर असल्याने बॉम्ब जास्तीत जास्त लांब नेणं माझं मुख्य लक्ष्य होतं', असं अभिषेक पटेल यांनी सांगितलं आहे. 'ट्रेनिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं आहे की, जर बॉम्बस्फोट झाला तर 500 मीटर अंतरापर्यंत प्रचंड नुकसान होतं', अशी माहिती अभिषेक पटेल यांनी दिली आहे. 

बॉम्ब नेमका कुठून आला याची माहिती अद्याप मिळाली नसून पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपुर्वी बन्नड गावातही अशाच प्रकारचा एक बॉम्ब सापडला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. 

'गावापासून जवळच आर्मी रेंज आहे. बॉम्ब गावात कसा पोहोचला याचा तपास आम्ही करणार आहोत', असं वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश सक्सेना यांनी सांगितलं आहे. कठीण प्रसंगी धाडस दाखवणा-या अभिषेक पटेल यांच्यासहित सर्व पथकाचा सन्मान करण्यात येणार आहे. 

Web Title: Cop Ran With 10 Kg Bomb On His Shoulder For 1 Km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.