भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:59 AM2021-09-14T07:59:45+5:302021-09-14T08:00:42+5:30

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून हेच गुजरात मॉडेल या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून भाकरी फिरवावीच लागते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Bread has to be turned, Shiv Sena fired an arrow at the change of Chief Minister of jugarat | भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण

भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण

Next
ठळक मुद्देभूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. 'मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही' हाच संदेश मोदी यांनी दिला

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेणाऱ्या भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि त्यांची खाती ठरवावी लागणार आहेत. त्यांनी आज एकट्यानेच शपथ घेतली. गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून देणे, हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असून, त्यासाठी वेळ खूप कमी आहे. गुजरातमध्ये २००२ पासून भाजप सलग सत्तेत आहे. त्यामुळे २० वर्षानंतरही राज्यातील सत्र कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपच्या या बदलावरच शिवसेनेनं सामनातून बाण सोडले आहेत. 

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून हेच गुजरात मॉडेल या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून भाकरी फिरवावीच लागते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण, एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे 'मॉडेल' असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे. 

माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही 

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी 'यालाच' किंवा 'त्यालाच' मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. 'मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही' हाच संदेश मोदी यांनी दिला आहे, असे म्हणत शिवसेनेनं मोदींना आपलं मानणाऱ्या पत्रकारांवर निशाणा साधला आहे. 

भुपेंद्र पटेल यांना अनुभव कमीच

पुढील वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होतील. पटेल समाजाची नाराजी दूर करणे, त्यांना भाजपकडे खेचणे यासाठी त्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागतील. पटेल २०१७ साली पहिल्यांदा आमदार झाले आणि आता थेट मंत्री. त्यांना प्रशासनाचा अनुभवही नाही. त्यामुळे ते सरकार, प्रशासन व पक्ष यांच्यात कसा समन्वय ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधी भाजपने २०१७ साली विधानसभा आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले होते. त्यामुळे पटेल समाज अधिक नाराज झाला होता. आता माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने ते व समर्थक नाराज आहेत. आपण नाराज नसल्याचे ते आज म्हणाले, तेव्हा त्यांच्या डोळय़ांत अश्रू तरळत होते. शपथविधीआधी भूपेंद्र पटेल यांनी नितीन पटेल यांची भेट घेतली. विजय रुपानी यांचे आशीर्वाद घेतले.

Web Title: Bread has to be turned, Shiv Sena fired an arrow at the change of Chief Minister of jugarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.