नवी दिल्ली, दि. 12 - सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निमंत्रित केलं आहे. बिहारमधील महाआघाडीमधून बाहेर पजत नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने राजकीय भूकंप आला होता. आता त्याच पार्श्वभुमीवर त्यांना एनडीएमध्ये सामील होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 

शुक्रवारी नितीश कुमार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित शहा यांनी ट्विट करत सांगितल होतं की, 'मी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांची निवासस्थानी भेट घेतली. एनडीएत सामील होण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आहे'. 


19 ऑगस्ट रोजी जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एनडीएत सामील होण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. पाटणामध्ये ही बैठक होणार आहे. यानंतरच जेडीयूचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही हे स्पष्ट होईल. याबद्दल नितीश कुमार यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी जो काही निर्णय होईल तो नॅच्युरल असेल असं उत्तर दिलं होतं. 'जर आम्ही बिहार सरकारमध्ये एकत्र आहोत, तर केंद्र सरकारमध्ये जाणं साहजिक आहे', असं नितीश कुमार बोलले होते. 

तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सत्तेतून माघार घेतली होती. मात्र यानंतर 24 तासाच्या आत भाजपाशी हातमिळवणी करत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या निर्णयावर वरिष्ठ नेते शरद यादव नाराज असून त्यांनी राज्यात संवाद यात्रा काढली आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले.