एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 02:41 PM2019-01-13T14:41:46+5:302019-01-13T15:08:24+5:30

सपा-बसपा आघाडीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचा निर्णय

after sp bsp alliance Congress To Contest Lok sabha Polls In Up Alone On All 80 Seats | एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

googlenewsNext

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडी केल्यानंतर एकट्या पडलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 80 मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवू आणि या निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं. काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसमधील काही नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. (सविस्तर वृत्त लवकरच)




काल समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडीची घोषणा केली. दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावती आणि अखिलेश यादव या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज काँग्रेसचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. या निवडणुकीचे निकाल आश्चर्यजनक असतील, असा दावादेखील त्यांनी केला. 




आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये देशभरात मुख्य लढत होईल आणि त्यासाठी पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे, असं आझाद म्हणाले. आम्हाला महाआघाडी करायची होती. मात्र त्यांना आमची साथ नको होती. आता आम्ही सर्व जागा लढवण्यास तयार आहोत. आम्ही पूर्ण तयारी केली असून भाजपाला हरवण्यासाठी जो पक्ष आमच्या सोबत येईल, त्याचं आम्ही स्वागतच करू, असं म्हणत आझाद यांनी काँग्रेस इतर पक्षांसाठी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले. 2009 च्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 21 जागा जिंकल्या होत्या.

समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीकडून काँग्रेसला महाआघाडीत स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काल पत्रकार परिषद घेत या शक्यतांना पूर्णविराम दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं स्वबळावर 80 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: after sp bsp alliance Congress To Contest Lok sabha Polls In Up Alone On All 80 Seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.