वसंत आबाजी डहाके यांना यंदाचा ‘जनस्थान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:35 AM2019-01-30T01:35:36+5:302019-01-30T01:36:20+5:30

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे.

 Vasant Abaji Dahake to be 'Janasthan' | वसंत आबाजी डहाके यांना यंदाचा ‘जनस्थान’

वसंत आबाजी डहाके यांना यंदाचा ‘जनस्थान’

googlenewsNext

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी येत्या २७ फेब्रुवारीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी मंगळवारी (दि. २९) आयोजित पत्रकार परिषदेत ‘जनस्थान’ पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये, ब्रॉँझची सूर्यमूर्ती आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि चित्रकार म्हणून वसंत आबाजी डहाके यांची ओळख आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी जन्मलेल्या डहाके यांनी खासगी व शासकीय महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन करतानाच त्यांची वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून बहरली. १९६० साली ‘सत्यकथा’ या मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. १९७२ मध्ये याच नावाने त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांचे शुभवर्तमान, शुन:शेप, चित्रलिपी आणि वाचाभंग हे काव्यसंग्रह, सर्वत्र पसरलेली मुळे हे दीर्घ काव्य, मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती हे संशोधित लेखन, यात्रा-अंतर्यात्रा हा ललितलेख, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, मालटेकडीवरून हा ललित लेखसंग्रह तसेच मराठीतील कथनरूपे, दृश्यकला आणि साहित्य प्रकाशित झालेले आहेत. मराठीतील कोशवाङ्मयातही त्यांनी मोलाची भर घातली आहे. ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहाकरिता त्यांना २००९ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार, कादंबरी व कवितेसाठी महाराष्टÑ शासनाचे पुरस्कार, २००३ मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार, २००५ मध्ये महाराष्टÑ फाउण्डेशनचा पुरस्कार, २०१० मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने शांता शेळके पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. चंद्रपूर येथे २०१२ मध्ये भरलेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. दरम्यान, पत्रकार परिषदेला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, अरविंद ओढेकर, रंजना पाटील, किशोर पाठक आदी विश्वस्त उपस्थित होते.
निवड समितीची बैठक
पुरस्काराची निवड घोषित करण्यापूर्वी निवड समितीची बैठक झाली. बैठकीला संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले व रेखा इनामदार-साने हे सदस्य उपस्थित होते. यावेळी मराठीतील प्रमुख साहित्यिकांच्या कामगिरीवर सखोल चर्चा होऊन वसंत आबाजी डहाके यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले.
यापूर्वी यांचा झाला गौरव
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आजवर विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५) आणि विजया राजाध्यक्ष (२०१७) यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मला घोषित झाल्याचे समजल्यानंतर खूप छान वाटले, आनंद वाटला. एवढा मोठा पुरस्कार प्राप्त होणे ही आनंददायी घटना आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारामागे कुसुमाग्रजांचे नाव व प्रेरणा असल्याने त्याचा विशेष अभिमान आहे. आजवर नामवंत मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ साहित्यिक

 

Web Title:  Vasant Abaji Dahake to be 'Janasthan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.