घातपाताचा कट उधळला : तिघांना अटक; काडतुसे, रायफली, रिव्हॉल्व्हर ताब्यात चांदवडजवळ शस्त्रसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:33 AM2017-12-16T01:33:59+5:302017-12-16T01:35:37+5:30

उत्तर प्रदेशातून मुंबईकडे बोलेरो गाडीतून आणण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (दि. १४) रात्री चांदवड टोलनाक्याजवळ जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला.

Three killed; Cadetes, rifles, seized arms and ammunition near the moonlight, near the Revolver | घातपाताचा कट उधळला : तिघांना अटक; काडतुसे, रायफली, रिव्हॉल्व्हर ताब्यात चांदवडजवळ शस्त्रसाठा जप्त

घातपाताचा कट उधळला : तिघांना अटक; काडतुसे, रायफली, रिव्हॉल्व्हर ताब्यात चांदवडजवळ शस्त्रसाठा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देसंशतियांनी डिझेलचे पैसे न देताच पळ काढला वाहनाची बारकाईने झडती१२ लाख किमतीचा अग्नीशस्त्रसाठा जप्त

चांदवड/नाशिक : उत्तर प्रदेशातून मुंबईकडे बोलेरो गाडीतून आणण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (दि. १४) रात्री चांदवड टोलनाक्याजवळ जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला. पेट्रोल पंपचालकाने दिलेल्या माहितीवरून कारवाई करत घातपाताचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले.
मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाके शिवारातील एका पेट्रोलपंपावर गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास रुपेरी रंगाच्या बोलेरो जीपमध्ये (एमएच ०१ एसए ७४६०) चालकासह तीन इसमांनी २७०० रुपयांचे डिझेल भरले. या वाहनातील संशतियांनी डिझेलचे पैसे न देताच चांदवडच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे पेट्रोल पंपचालकाने ही माहिती कळविल्यानंतर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडून जिल्हा नियंत्रण कक्ष, चांदवड पोलीस ठाण्यालाही वायरलेसद्वारे ही माहिती कळविण्यात आली. या दरम्यानच चांदवड पोलीस मुंबई-आग्रा महामार्गावर मोबाइल व्हॅनसह गस्त घालत होते. वायरलेसद्वारे त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी चांदवड टोलनाका येथे सापळा रचून मिळालेल्या माहितीची बोलेरो जीप अडवली. या वाहनातील चालक व अन्य दोघांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने एडीएस पथकातील पोलिसांनी संबंधित बोलेरो व त्यांना चांदवड पोलीस ठाण्यात नेऊन वाहनाची बारकाईने झडती घेतली. जीपच्या टपावर कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. या कप्प्याची तपासणी केली असता त्यात लपविलेली १७ रिव्हॉल्वर, दोन परदेशी बनावटीचे पिस्टल, एक पंप अ‍ॅक्शन गन, एक रायफल, १२ बोअर डबल बॅरलच्या ८ रायफल, १२ बोअर सिंगल बॅरलच्या दोन रायफल, पॉइंट २२च्या १० रायफल, तसेच ४ हजार १४२ जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ३७ हजार रुपये किमतीचा अग्नीशस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचे समजताच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३) रा. वडाळा, जि. नाशिक, सलमान अमानुल्ला खान (१९), रा. शिवडी मच्छी गुदाम मुंबई, बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमित ऊर्फ सुका (२७) रा. शिवडी, मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी व भादंविच्या कलम ४८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
१३ दिवसांची पोलीस कोठडी
बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रक रणी पोलिसांनी अटक केलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने तिघांनाही १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान या अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकारणी कोणाचा हात असून, कट काय होता हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बोलेरो जीपच्या टपावर कप्पा
शस्त्रास्त्रे लपविण्यासाठी जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आला होता. त्यात १७ रिव्हॉल्व्हर, दोन परदेशी बनावटीचे पिस्तूल, एक पंप अ‍ॅक्शन गन, एक रायफल, १२ बोअर डबल बॅरलच्या ८ रायफल, १२ बोअर सिंगल बॅरलच्या दोन रायफल, पॉइंट २२च्या १० रायफल, तसेच चार हजार १४२ जिवंत काडतुसे सापडली. हा शस्त्रसाठा सुमारे १२ लाख ३७ हजार रुपये किमतीचा आहे.
उत्तर प्रदेश कनेक्शन
आरोपींनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील न्यू पंजाब मेसर्समधून जबरी लूट करून ही शस्त्रे आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. शस्त्रसाठा घेऊन ते मुंबईच्या दिशेने निघाले होते.
पोलीस अधिकारी पोहोचले
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे हे चांदवडला पोहोचले.

Web Title: Three killed; Cadetes, rifles, seized arms and ammunition near the moonlight, near the Revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस