तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:17 AM2018-05-14T00:17:32+5:302018-05-14T00:17:32+5:30

यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून, मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.

Temperature increases health problems | तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

Next

मालेगाव : यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून,मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.
सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाची दाहकता वयोवृद्ध व लहान बालकांबरोबरच सर्वांना असह्य झाले आहे, यामुळे अनेकांना उष्णतेच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या व वाढत्या तपमानामुळे इतर आजारांनी डोके वर काढले आहे. साहजिकच परिसरातील सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. वाढलेल्या तपमानामुळे उलटी, मळमळ, ताप, सर्दी, खोकला आदी विकारांसह अंगावर पुरळ येणे, यासारख्या आजारांची लागण होताना दिसत आहे. या विकारांमुळे रुग्णांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. असह्य अशा उकाड्याने सर्वांनाच घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्वचेचे आजारही उद्भवत आहेत. मानेवर, पाठीवर, डोक्यावर तसेच हातापायांवर घामामुळे पुरळ येत असून त्वचा कोरडी पडणे, अंगाला खाज येणे, शरीराच्या अवघड भागात गाठी येणे असे विकार डोकावत आहेत.  वाढत्या उन्हामुळे सर्वच मंडळी स्वत:चा बचाव करण्यासाठी व उष्णतेची तीव्रता कमी होण्यासाठी जास्तीत जास्त शीतपेये घेताना दिसत आहेत; मात्र घातक अशा शीतपेयांमुळे घसा सुजणे, खवखवणे, सर्दी यांसारख्या आजारांना आमंत्रण देत आहे.
अनेक भागात अघोषित संचारबंदी
सकाळी ८ वाजेपासून सूर्यदेव आग ओकण्यास सुरुवात करत असून हा सूर्याचा प्रकोप दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढता राहतो. त्यानंतर मात्र तपमानात घट होण्यास सुरुवात होते. या वेळेत शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणीही सामसूम होत आहे. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होत असून अनेक भागात अघोषित संचारबंदी लागत आहे. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते ओस पडत आहेत.  यंदा तपमानात वाढ असली तरी लग्नसराईने नागरिकांना गावोगावी फिरावे लागत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होत आहे. दूषित पाणी व झाडांची कमतरता भासत असल्याने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत आहे.

Web Title: Temperature increases health problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.