‘स्मार्ट सिटी’च्या सीईओंची गच्छंती अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:06 AM2019-06-08T01:06:19+5:302019-06-08T01:06:34+5:30

शहर द्रुतगतीने स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या विविध निविदेतील संशयास्पद व्यवहार आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या महापालिका पदाधिकारी संचालक तसेच दोन आमदारांनी काढलेले बहिष्कारास्त्र कामी आले आहे.

 'Smart City' CEOs are unavoidable | ‘स्मार्ट सिटी’च्या सीईओंची गच्छंती अटळ

‘स्मार्ट सिटी’च्या सीईओंची गच्छंती अटळ

Next

नाशिक : शहर द्रुतगतीने स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या विविध निविदेतील संशयास्पद व्यवहार आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या महापालिका पदाधिकारी संचालक तसेच दोन आमदारांनी काढलेले बहिष्कारास्त्र कामी आले आहे. कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांना तत्काळ कार्यमुक्त करावे ही मागणी अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी अखेरीस मान्य केली असून, पर्यायी अधिकारी शोधण्यात येईल असे स्पष्ट केले. परंतु थविल यांची बदली होईपर्यंत बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर कुंटे यांनी शुक्रवारी (दि.७) होणारी बैठक रद्द केली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीची बैठक दुपारी ३ वाजता होणार होती. तत्पूर्वीच अध्यक्ष सीताराम कुंटे यांची भेट घेऊन आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, संचालक दिनकर पाटील, अजय बोरस्ते, शाहू खैरे आणि गुरुमित बग्गा यांनी कंपनीच्या कारभारात नाराजी व्यक्त केली आणि प्रकाश थविल तसेच अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले आयटी विभागाचे तज्ज्ञ व्यवस्थापक गुजर यांची मनमानी सुरू असल्याचा तक्रारींचा पाढा वाचला आणि थविल यांना हटविल्याशिवाय बैठकीस उपस्थित राहणार नाही असे सांगितले. आमदार आणि महापौरांनीच थेट असा पवित्रा घेतल्याने अध्यक्ष कुंटे तसेच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या मागणीला तत्त्वत: पाठिंबा दिला. शासकीय प्रक्रिया करून अधिकारी शोधला जाईल, असे त्यांनी सांगितल्यानंतर संचालक माघारी परतले.सध्या स्काडा मीटरचा प्रश्न गाजत आहे. शहरातील दोन लाख घरांच्या नळजोडणीला अत्याध्युनिक तंत्रज्ञान असलेले स्काडा मीटर बसविण्यासाठी २८० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, त्यासाठी निविदा मागविल्यानंतर शुद्धीपत्रकात निविदांची तीन तुकड्यांत विभागणी करण्यात आले. यासह अन्य अनेक बदल केल्याने कंपनीचा कारभार वादात सापडला आहे. त्यातच कंपनीचे सीईओ प्रकाश थविल हे संचालकांना योग्य वागणूक देत नाही आणि कोणत्याही प्रकारची
दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होत आहे. एक किलोमीटरचा स्मार्टरोड तयार करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च कमी पडला असून, आणखी तीन कोटी ७९ लाख रुपयांचा वाढीव खर्च देण्याचे नियोजन आहे. कालिदास कलामंदिराचे काम संपल्यानंतर आता विलंबाने या कामासाठी वाढीव ५० लाख रुपये ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव आहे.
थविल कोणाच्या दबावाखाली काम करतात?
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल एका राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली कामकाज करीत असल्याचा आरोप काही संचालकांनी केला. संबंधितांचे नाव न सांगता त्यांनी अशाप्रकारच्या बाह्णशक्तींचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे सांगितले.
काय होते वादाचे मुद्दे
स्काडा मीटर निविदेतील फेरबदल
स्मार्टरोडच्या ठेकेदाराला दंड करण्याऐवजी ३ कोटी ७९ लाख रुपयांची बक्षिसी
स्मार्टरोडच्या कामाची गुणवत्तेचा प्रश्न
ग्रीन फिल्ड प्रकरणात चुकीची कार्यपद्धती
होळकर पुलाखालील गेटच्या कामात ८ कोटींची वाढ
कालिदास, फुले कलादालनाच्या दर्जाबाबत शंका

Web Title:  'Smart City' CEOs are unavoidable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.