नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

By अझहर शेख | Published: April 20, 2024 08:12 PM2024-04-20T20:12:13+5:302024-04-20T20:12:24+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

Slum fire in Nashik The lives of poor families are ruined three people are injured | नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

नाशिक : भारतनगरमधील साठफुटी रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीतील लेन क्रमांक-८मध्ये असलेल्या एका झोपडीवजा पत्र्याच्या खोलीत शनिवारी (दि.२०) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाला. क्षणार्धात या झोपडीच्या आजुबाजुला असलेल्या अन्य सात ते आठ झोपड्यांनाही आगीने वेढा दिला. वस्तीतील युवकांनी धाव घेत घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दोन महिलांसह एक पुरूष भाजल्याच्या पोलीस सुत्रांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीतील भारतनगर येथे असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या इमारतींसमोरील लेन क्रमांक-८मध्ये दुपारी आगडोंब उसळला. दुपारी उन्हामुळे वस्तीत शांतता होती. हातावर काम करणारे लोक काही कामावर गेलेले होते तर काही घरांमध्ये झोपलेले होते. याचवेळी एकच आरडाओरड, गोंगाट अन् पळापळ सुरू झाली. महिलांनी हाती लागेल ती वस्तू उचलून घरातू बाहेर रस्त्याच्यादिशेने पळ काढला. आगीची तीव्रता क्षणार्धात इतकी वाढली की या गल्लीतील पत्र्याच्या आठ ते दहा घरांना आगीने कवेत घेतले. घरातील सर्व संसारपयोगी वस्तू बेचिराख झाल्या. शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे मुख्यालयासह पोलिसांच्या डायल ११२वर नागरिकांनी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली. माहिती मिळताच मुख्यालयाती दोन बंबांसह सिडको उपकेंद्रांवरील दोन असे चार बंब एकापाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले. दाट लोकवस्ती अरूंद गल्लीबोळ अन् बघ्यांच्या गर्दीचा अडथळ्यामुळे नेहमीप्रमाणे आपत्कालीन स्थितीवर नियंत्रण मिळविताना अग्नीशमन दलाला कसरत करावी लागली. जवानंनी दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करत शर्थीचे प्रयत्न करून आग पसरवू दिली नाही; अन्यथा आजुबाजुला असलेली अन्य घरेसुद्धा बाधीत झाली असती. तौसिफ शहा, रमेश पाटोळे, दिलीप सगट, विरेंद्र शर्मा, भारती ज्ञानेश्वर गोसावी, आरती दिपक यांच्यासह अन्य चौघा गोरगरीब कुटुंबियांचा संसार या आगीमध्ये जळाला. तासाभरात आग शमविण्यामध्ये जवानांना यश आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Slum fire in Nashik The lives of poor families are ruined three people are injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक