जिल्ह्यातील रस्ते गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:54 AM2017-08-23T00:54:08+5:302017-08-23T00:54:31+5:30

The roads in the district went into the pits | जिल्ह्यातील रस्ते गेले खड्ड्यात

जिल्ह्यातील रस्ते गेले खड्ड्यात

googlenewsNext

नांदगाव : नांदगाव शहरातून जाणाºया राज्य महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातांचे जणू सापळे झाले आहेत. जनक्षोभानंतर गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे यांनी भेट देऊन पंधरा दिवसांत खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र आज आधीचे खड्डे अधिक मोठे झाल्याचे दिसून येत असून, आपल्याच आश्वासनाला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून बांधकामाचे गज बाहेर आले आहेत. तर जैन धर्मशाळा ते मनमाड-मालेगाव वळणापर्यंत असंख्य खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने त्याच्या आकारमानाचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी वाहने हमखास यात सापडतात. मोठ्या वाहनांचे पाटे तुटल्याची उदाहरणे आहेत. या रस्त्यावरून जाणारे शेकडो विद्यार्थी व नागरिक अंगावर उडणारे घाण पाण्याचे फवारे झेलताना त्रस्त झाले आहेत. याप्रश्नी राष्ट्रवादी पक्षातर्फे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता व इतरांनी आंदोलन केले होते. आमदार पंकज भुजबळांनी अधिकारीवर्गाला सूचना दिल्या, पण उपयोग झाला नाही. एप्रिल, मे महिन्यात विशेष रस्ता दुरुस्तीची निविदाप्रक्रि या राबविली गेली नव्हती. पूर्वी आधी काम व्हायचे पण आता आधी निविदाप्रक्रि या पूर्ण करावी लागते, त्यानंतर काम होते. अशी माहिती देताना आहिरे यांनी सदरचा रस्ता हा राज्यमार्ग असून, लवकरच तो राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार असल्याची माहिती नांदगाव येथील भेटीत आहिरे यांनी दिली होती. तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून कसे जायचे? या नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला आहिरे यांनी थातुरमातुर उत्तरे देऊन बोळवण केली. पंधरा दिवसांत खड्डे बुजवून देतो, हे आश्वासन आहिरे यांची पाठ वळली आणि हवेतच विरून गेल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. नायगाव
सिन्नर-सायखेडा रस्त्याची जायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनला असल्याने संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिन्नर ते नायगाव या १३ किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मापरवाडी परिसरात रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्याने वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे चालकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच जायगाव घाटाजवळील माळेगाव फाट्यावर एकाच खड्ड्याने संपूर्ण रस्ता व्यापला असून, येथे रस्ताच गायब झाला आहे. रंगाळी चिंचाजवळही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ता अरूंद बनला आहे. याठिकाणी छोटा नाला असल्यामुळे नेहमी पाणी साचून रस्ता खचला आहे.
जायगाव येथे हनुमान मंदिर परिसरात या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, त्यामध्ये हातपंपाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अजिबात अंदाज येत नसल्यामुळे हा परिसर अपघात प्रवणक्षेत्र बनला आहे. सकाळ -संध्याकाळ या परिसरात शालेय विद्यार्थी, दर्शनासाठी ग्रामस्थांची व हातपंपावर महिलांची मोठी गर्दी असते. वाहनांच्या वर्दळीमुळे या खड्ड्यांमधील पाणी अंगावर उडण्याच्या प्रकारामुळे वारंवार वादाचे प्रसंग घडत आहे. या ठिकाणी शिंदे-पाटपिंप्री या रस्त्याच्या दुरुस्ती करणाºया निर्मिती कन्स्ट्रक्शन कंपनीने गेल्या वर्षभरापासून रस्ता खोदून रस्त्यावर खडी उघडी ठेवल्याने वाहनांच्या चाकांच्या दाबाने ही खडी येणाºया जाणाºया नागरिकांना दुखापत करत आहे. संबंधितांना या प्रकाराबाबत अनेकदा सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे.
सिन्नर ते नायगाव रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाने गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जायगाव, नायगाव, देशवंडी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
साक्र ी-नामपूर-सटाणा-पिंपळदर-मांगबारी-खामखेडा-बेज-कळवण-नांदुरी-नाशिक हा राज्य महामार्ग असून, हा रस्त्या नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु पिंपळदर मांगबारी घाट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालकांना या रस्त्यावर वाहने चालविताना कसरत करावी लागते. हा रस्ता सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने मागे सटाणा सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावर खड्ड्यांची डागडुजी केली होती; मात्र हे काम करताना खड्ड्यातील माती व्यवस्थित न करता तसेच त्यात खडी व डांबर टाकण्यात आले. डांबर कमी प्रमाणात टाकल्यामुळे पावसाळा सुरू होताच खड्ड्यातील डांबर निघून पुन्हा खड्डे तयार होत आहे. त्यातच खड्ड्यांची डागडुजी करताना फक्त मोठ्या खड्ड्यांची डागडुगी केली व लहान खड्डे तसेच सोडल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून हे खड्डे मोठे होत आहेत.

Web Title: The roads in the district went into the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.