शाळांमधून होणार ‘आधार’ची नोंदणी

By admin | Published: August 10, 2015 11:24 PM2015-08-10T23:24:43+5:302015-08-10T23:25:15+5:30

धावपळ थांबणार : येत्या आठवड्यात होणार अंमलबजावणी

Registration of Aadhaar will be done in schools | शाळांमधून होणार ‘आधार’ची नोंदणी

शाळांमधून होणार ‘आधार’ची नोंदणी

Next

नाशिक : आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद पडल्याने नागरिकांची होणारी धावपळ लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शाळांमध्येही लवकरच आधारकार्ड नोंदणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पालकांची धावपळ थांबणार आहे.
शहरातील अनेक आधार केंद्रांवर नोंदणी करताना पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आणि झालेल्या वादांचे पर्यावसन म्हणून अनेक केंद्रे बंद झाली. त्यातच विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच शासनाने आधारकार्ड अनिवार्य केल्याने ते काढण्यासाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी होऊ लागली. संबंधित संस्थेने मोजक्याच ठिकाणी ही केंद्रे सुरू ठेवल्याने त्याही ठिकाणी पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागल्या. त्यातच महापालिकेने सोमवारपासून सर्व विभागीय कार्यालयात आणि सेतूच्या चारही कार्यालयांमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शाळेतील विविध योजनांसाठी विद्यार्थ्यांनाही आधारकार्डची मागणी केली जात असल्याने त्यांच्या आधारकार्डची चिंता पालकांना सतावत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रांवर सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत होते. त्यातून सुटका होण्यासाठी पालिकेने शहरांतील मनपा शाळांसह खासगी शाळांमध्येही त्याची व्यवस्था केली आहे. त्यानुसार सोमवारपासून शाळेनिहाय विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकेल. यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांसाठी १२ यंत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पालकांना केंद्रांवर रांग लावावी लागणार नाही. त्यातच पालिकेच्या कार्यालयांमध्ये नोंदणी सुरू होणार असल्याने उर्वरित नोंदणीही पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ८५ टक्के नागरिकांनी आधार नोंदणी केल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. उरलेल्यांमध्ये शालेय मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची नोंदणी पूर्णत्वास जाऊ शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: Registration of Aadhaar will be done in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.