उत्तर महाराष्टत एक रानगवा, चितळ अन् पाच अस्वले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:36 PM2019-05-25T23:36:04+5:302019-05-26T00:39:34+5:30

दिवसेंदिवस वनक्षेत्राचे प्रमाण कमी होत चालल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे. परिणामी वन्यजिवांच्या संख्येवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

 A rango, chital and five ashwels in North Maharashtra | उत्तर महाराष्टत एक रानगवा, चितळ अन् पाच अस्वले

उत्तर महाराष्टत एक रानगवा, चितळ अन् पाच अस्वले

googlenewsNext

नाशिक : दिवसेंदिवस वनक्षेत्राचे प्रमाण कमी होत चालल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे. परिणामी वन्यजिवांच्या संख्येवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बुद्धपौर्णिमेच्या रात्रीपासून दुसऱ्या रविवारी (दि.२१) पर्यंत नाशिक प्रादेशिक विभागातील अभयारण्य क्षेत्रात करण्यात आलेल्या वन्यजीव प्रगणनेत सर्वाधिक कमी एक रानगवा, चितळ अन् पाच अस्वले आढळून आली.
पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वनक्षेत्र उजळून निघते. त्यानिमित्ताने नाशिक प्रादेशिक वन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर, कळसूबाई हरिश्चंद्रगड, यावल तीन अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये मचाण बांधून वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा देत वन्यजिवांच्या हालचाली टिपल्या. कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात भंडारदरा शिवारात एक रानगवा तर यावल भागातील पाल वनक्षेत्रात एक चितळ आणि जामन्या वनक्षेत्रात चार व पाल वनक्षेत्रात एक अशी पाच अस्वले आढळून आली.
वन्यजिवांच्या प्रजातींमध्ये या वन्यप्राण्यांची संख्या उत्तर महाराष्टत सर्वाधिक कमी असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच सायाळ (साळींदर) देखील घटले असून, यावल अभयारण्य क्षेत्रात ते केवळ चार आढळून आले. खोकडची संख्या पाच इतकीच शिल्लक राहिली आहे. त्यामध्ये दोन कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील राजूर वनात तर दोन यावल आणि एक अनेर डॅम परिसरात पहावयास मिळाले.
यासोबतच उदमांजरचेही प्रमाण कमी झाले असून, यापूर्वी विविध शहरांलगत असलेल्या खेड्यांमध्ये तसेच गावांमधील मळे परिसरात उदमांजर आढळून येत होते. मात्र या प्रगणनेत नांदूरमधमेश्वर व यावलमधील जामन्या वनक्षेत्रात प्रत्येकी एक असे दोन उदमांजर निदर्शनास आले. नाशिक प्रादेशिक विभागातील अभयारण्य क्षेत्रात लांडग्यांचेही प्रमाण कमालीचे घटले आहे. यावलमध्ये तीन आणि अनेर डॅम परिसरात चार असे केवळ सात लांडगे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चमकले.
अभयारण्यातून हरिण गायब
जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्र वगळता प्रादेशिक विभागातील वरील अभयारण्यांमध्ये बुद्धपौर्णिमेच्या प्रगणनेत एकही हरिण वन कर्मचाºयांना आढळून आले नाही. ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्र हरिण-काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी कळसूबाई हरिश्चंद्रगड, नांदूरमधमेश्वर या भागातही हरिण नजरेस पडत होते. मात्र यावर्षी एकाही हरणाची नोंद अभयारण्यातील वनक्षेत्रात होऊ शकली नाही.
अशी आहे वन्यजिवांची संख्या
मुंगूस- ४१, सांबर- ४०, ससा- ११५, वानर- ४३६, कोल्हे- ७१, रानमांजर- ६१, रानडुक्कर- २४७, तरस- ४०, माकड- ३६८, भेकर- ५०, घोरपड- ७, बिबटे- १२, नीलगाय- १२, शेकरू- ४, चिंकारा- ११, मोर- ७७

Web Title:  A rango, chital and five ashwels in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.