संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

By Suyog.joshi | Published: February 7, 2024 04:35 PM2024-02-07T16:35:26+5:302024-02-07T16:35:41+5:30

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहे

Probable water scarcity Geological survey will be done along with Nashik municipal movement ditch digging | संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

नाशिक (सुयोग जोशी): गेल्या काही दिवसांपासून शहरात होणाऱ्या संभाव्य पाणी कपातीची टांगती तलवार टाळण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने गंगापूर धरणात चर खोदण्याच्या हालचाली सुरू केल्या असून जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी तेरा लाख रुपये खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव तपासणीसाठी लेखापरीक्षणासाठी पाठविला आहे. ग्रीन सिग्नल मिळताच आयुक्तांच्या मंजुरीने मार्चच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षणासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कागदोपत्री सर्व तयारी करून ठेवली आहे.

महापालिकेच्यावतीने शहरात पाणीटंचाई होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहे. यंदाच्या हंगामात मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण जेमतेम ४९ टक्के भरल्याने नाशिकमधील गंगापूर व दारणातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. परिणामी महापालिकेने जलसंपदाकडे मागणी केलेले ६३०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षण फेटाळण्यात आले. मनपाला ५३०० द.ल.घ.फू. पाणी देण्यात आले. शहराची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी ५८०० द.ल.घ.फू. पाणी गरज आहे. त्यामुळे मागणीच्या पाचशे द.ल.घ.फू. पाण्याचा तुटवडा आहे.

मनपाच्या मागणीनुसार जलसंपदाने गंगापूर धरणातील सहाशे द.ल.घ.फू. पाणी वापरण्याची मनपास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरावरील पाणी कपात टळू शकते. परंतु धरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृतसाठ्यातील पाणी उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने चर खोदण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. मार्चपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन एप्रिलपर्यंत धरणात चर खोदण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सद्य:स्थितीत ३१ जुलैपर्यंत शहराची तहान भागविण्याचे नियोजन व धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता ११ दिवसांचा पाणी तुटवडा आहे.

Web Title: Probable water scarcity Geological survey will be done along with Nashik municipal movement ditch digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.