विश्वशांतीसाठी झाली नाशिकच्या चर्चमध्ये प्रार्थना,येशूच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिस्ती बांधवांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 05:30 PM2017-12-25T17:30:48+5:302017-12-25T17:33:04+5:30

 Prayer in the church of Nashik for world peace, crowd of Christians on the occasion of Jesus' birth anniversary | विश्वशांतीसाठी झाली नाशिकच्या चर्चमध्ये प्रार्थना,येशूच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिस्ती बांधवांची गर्दी

विश्वशांतीसाठी झाली नाशिकच्या चर्चमध्ये प्रार्थना,येशूच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिस्ती बांधवांची गर्दी

Next
ठळक मुद्दे होलिक्रॉस चर्चमध्ये नाताळनिमित्त आकर्षक देखावा चर्च रोषणाईने उजळून निघाले


नाशिक : विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव आज शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला.
ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळची तयारी काही दिवसांपासून सुरू होती. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च, वावरे लेन येथील संत थॉमस चर्च, त्र्यंबक नाक्यावरील होलिक्रॉस चर्च, नेहरूनगर येथील बाल येशू मंदिर, इंदिरानगर येथील जॉर्ज चर्च यांसह नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी भागांतील चर्च रोषणाईने उजळून निघाले होते. आठवडाभरापासून विविध चर्चच्या प्रांगणात रंगरंगोटीसह सजावटी व गव्हाणीच्या देखाव्याची तयारी सुरू होती.
रविवारी सायंकाळी ४ वाजता खिस्त जयंतीचा प्रार्थनाविधी (मिस्सा) झाला. त्यानंतर रात्री १० पासून प्रार्थनास्थळांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. ‘मिडनाइट सर्व्हिस’ उपदेश व पवित्र सहभागितेचा विधी झाला. सर्वच चर्चमध्ये पारंपरिक उत्साहात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांची शहरातील प्रमुख वसाहत असलेल्या शरणपूर रोडवरील वसाहतीसह नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर परिसरात रात्री ११ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने आसमंत उजळून निघाला होता. चर्चमध्ये धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक विशेष ‘मिस्सा’ प्रार्थना करण्यात आली. समाजबांधवांनी एकमेकांशी हस्तांदोलन करीत, गळाभेट घेऊन ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांना चॉकलेट, कॅडबरी, शुभेच्छापत्रे भेट देण्यात आली.
नाताळनिमित्त सोमवारी सकाळी ६ वाजेपासूनच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहिल्या प्रभूभोजनाचा विधी, उपासना, प्रार्थना, प्रवचन, पवित्र सहभागिता, संगीत महाविधी, उपदेश, केकवाटप आदी कार्यक्रम झाले. होली क्रॉस चर्चमध्ये नाशिकमधील पुरोगामी संघटना एकत्र येऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, साने गुरुजी व भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी फादर वेन्स्ली डिमेलो, वसंत एकबोटे, शांताराम चव्हाण, बी. जे. वाघ, व्ही. जी. जाधव, डॉ. रोहित कसबे, अनिता पगारे, रेखा जाधव, अलका एकबोटे, नानाजी गांगुर्डे, जयंत बोरिचा, सिद्धार्थ जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याचदरम्यान ‘भारतीय संविधान’ या विषयावर संदीप भावसार यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता भारतीय एकात्मता समिती, नाशिक कॅथलिक धर्मप्रांत आणि होलिक्रॉस चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीयांच्या वतीने नाशिकरोडच्या संत अण्णा मंदिरमध्ये नाताळ साजरा करण्यात आला. सर्व धर्मांचे प्रमुख व अनुयायी यावेळी उपस्थित होते. होलिक्रॉस चर्चमध्ये नाताळनिमित्त आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता. देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांसाठी चहा, कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title:  Prayer in the church of Nashik for world peace, crowd of Christians on the occasion of Jesus' birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.