नाशिक महापालिकेचा नवीन आकृतीबंध लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:43 PM2018-02-15T15:43:20+5:302018-02-15T15:45:44+5:30

रणजित पाटील : आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

A new pattern of Nashik Municipal Corporation will be started soon | नाशिक महापालिकेचा नवीन आकृतीबंध लवकरच मार्गी

नाशिक महापालिकेचा नवीन आकृतीबंध लवकरच मार्गी

Next
ठळक मुद्देआस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आणि शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधावर चर्चा मंजूर पदांमधील रिक्त पदांबाबत आयुक्तस्तरावर शासनाची मान्यता घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदे भरता येऊ शकतात

नाशिक - नाशिक महापालिकेने शासनाकडे पाठविलेला नवीन ७६५६ पदांचा आकृतीबंध मार्गी लावण्यासाठी येत्या सात ते दहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यासाठी विशेष बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृह आणि नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात रणजित पाटील यांनी गुरूवारी (दि.१५) शहरातील शासनाकडे असलेल्या प्रलंबित प्रश्नांसंबंधीचा आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सांगितले, बैठकीत आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आणि शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधावर चर्चा झाली. येत्या सात ते दहा दिवसात त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मंजूर पदांमधील रिक्त पदांबाबत आयुक्तस्तरावर शासनाची मान्यता घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदे भरता येऊ शकतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत, रस्त्यांची कामे, एलईडी, आरोग्य, स्मार्ट सिटी, मलनि:स्सारण या प्रश्नांवरही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पाणी, सांडपाणी व कचरा यांचे जोपर्यंत सुयोग्य नियोजन होत नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीला दिशा मिळणार नाही. त्यामुळे, या प्रश्नांकडे लक्ष पुरविले जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, बैठकीत महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील यांनी काही सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने, ६ आणि ७.५० मीटर रस्त्यालगत बांधकामांना टीडीआर व प्रीमिअम लागू करणे, वैतरणा जलविद्युत प्रकल्पातील पाणी मुकणे धरणात सोडणे, गंगापूर धरणात रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अनुदान देणे, महापालिकेच्या खुल्या जागांवरील दहा टक्के जागेत धार्मिक स्थळ उभारण्यास परवानगी देणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सफाई कामगारांची भरती, खेडे विकास निधी, स्मार्ट लायटींग प्रकल्प आदी मुद्यांचा समावेश होता. यावेळी, आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही शाासनाकडे प्रलंबित असलेल्या आस्थापना आराखड्यासंबंधी चालना देण्याची विनंती केली. बैठकीला, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार आदी उपस्थित होते.
काय आहे आकृतीबंध?
महापालिकेने आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील मंजूर पदांचा व नव्याने आवश्यक असलेल्या पदांचा आढावा घेऊन आकृतीबंध तयार केला असून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. या आकृतीबंधानुसार महापालिकेत ७६५६ नवीन पदे प्रस्तावित करण्यात आली असून या पदांना मंजुरी मिळाल्यास महापालिकेतील आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या ७०९० वरून १४ हजार ७४६ होणार आहे.

Web Title: A new pattern of Nashik Municipal Corporation will be started soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.