नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:49 PM2018-03-23T18:49:49+5:302018-03-23T18:49:49+5:30

प्रभाग १३ : तिघांची माघार, आठ उमेदवार रिंगणात

 In Nashik Municipal Corporation's by-election, the tricolor is contesting | नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

googlenewsNext
ठळक मुद्देमनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढतमनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टवादीने पाठिंबा दर्शविला आहे

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशिब अजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिका-यांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (दि.२३) अर्ज मागे घेण्यासाठी मुदत होती. त्यात, भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, भाजपाच्याच तिकिटावर गेल्यावेळी लढलेल्या कीर्ती शुक्ल आणि मनसेच्या डमी उमेदवार रश्मी सचिन भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे, निवडणूक रिंगणात मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरिष लोणारी यांचेसह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समीना कयुम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीमा मकसूद खान यांच्यात लढत होणार आहे. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले गेले. परंतु,त्यात यश आले नाही. मनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टवादीने पाठिंबा दर्शविला आहे. मनसेच्या उमेदवारासमोर शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तर भाजपानेही उमेदवार दिल्याने ख-या अर्थाने तिरंगी सामना रंगणार आहे. शनिवारी (दि.२४) उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. ४ एप्रिल पर्यंत प्रचारासाठी अवधी असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे. दि. ६ एप्रिल रोजी मतदान होऊन ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य मैदानात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
भाजपा उमेदवारावर दबाव
मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजपातील काही पदाधिका-यांचा एक गट प्रयत्नरत होता. त्यानुसार, सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात शहराध्यक्षांसमवेत पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी, पक्षाच्या उमेदवार विजया लोणारी यांनी माघार घ्यावी, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यापुर्वी दोन वेळा माघार घेण्यास भाग पाडल्याने लोणारी यांनी माघारीस स्पष्ट नकार दिला. त्यामुळे, पदाधिका-यांचा नाईलाज झाला. अखेर, डमी उमेदवार कीर्ती शुक्ल आणि माधुरी जाधव यांचेच अर्ज मागे घेण्यात आले.

Web Title:  In Nashik Municipal Corporation's by-election, the tricolor is contesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.