नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:49 PM2018-01-04T13:49:41+5:302018-01-04T13:52:54+5:30

२१८ कोटींच्या निविदा प्रसिद्ध : मार्चच्या आतच कार्यादेश निघण्याची शक्यता

 Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील

नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील

Next
ठळक मुद्दे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकास कामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहेअंदाजपत्रकात तरतूद नसताना रस्ते विकासाचा हा घाट घातल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखी पत्र देत या प्रकाराला विरोध दर्शविला होता

नाशिक - मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून सुमारे २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिल्याचे प्रकरण वादात अडकले असतानाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. ७ फेबु्वारीला निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षातच मार्च अखेर ठेकेदारांच्या हाती कार्यादेश पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकास कामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहे.
शहरात गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांवर सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करणा-या महापालिकेत मागील वर्षी सत्तेत आलेल्या भाजपाने २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा घाट घातला. महापालिकेच्या नाजूक परिस्थितीचे दाखले देणा-या आयुक्तांकडूनही सत्ताधारी भाजपाला साथ लाभली आणि मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकात तरतूद नसताना रस्ते विकासाचा हा घाट घातल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखी पत्र देत या प्रकाराला विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ भाजपाचेच नगरसेवक कमलेश बोडके यांनीही घरचा अहेर देत विरोधाची भूमिका घेतली होती. कॉँग्रेस-राष्टवादीही या विरोधात सहभागी झाली तर शिवसेनेची भूमिका संदिग्ध राहिली. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षक यांनी या कामांबाबत निधी उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामांचा समावेश राहणार नसल्याचे ठामपणे सांगत आयुक्तांनी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातच त्याची तरतूद होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता सुधारित अंदाजपत्रकात या कामांसाठी तरतूद करण्यात येत असून मार्चअखेर पर्यंत कार्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर डांबर पडण्यास सुरूवात होणार आहे.
एमआयडीसी भागातही रस्ते
महापालिकेने एमआयडीसी परिसरातीलही रस्त्यांच्या कामांचा समावेश केला आहे. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामांबाबत उद्योजकांकडून सातत्याने मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवरच एमआयडीसी परिसरात ८.८६ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रभाग ११ ला दुहेरी लाभ होणार असून प्रभागातील रस्त्यांसाठीही ६.२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाला ७.५० कोटी रुपये याप्रमाणे रस्ते विकासाचा निधी मिळणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.

Web Title:  Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.