महापालिकेकडून नाशिक शहरात ई-वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:10 PM2018-01-11T14:10:29+5:302018-01-11T14:12:13+5:30

प्रस्ताव मंजूर : सहाही विभागात उभारणार केंद्र

 Nashik Municipal Corporation decided to start e-waste collection center in Nashik city | महापालिकेकडून नाशिक शहरात ई-वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय

महापालिकेकडून नाशिक शहरात ई-वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय

Next
ठळक मुद्देशहरात संकलित होणा-या घनकच-यात मोठया प्रमाणावर इलेक्ट्रानिक स्वरूपातील कचरा आढळून येत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे जिकरीचेभारत सरकारच्या ई-वेस्ट मॅनेजमेंट नियमावलीनुसार, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील कच-याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक

नाशिक - शहरात संकलित होणा-या घनकच-यात मोठया प्रमाणावर इलेक्ट्रानिक स्वरूपातील कचरा आढळून येत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे जिकरीचे ठरत आहे. भारत सरकारच्या ई-वेस्ट मॅनेजमेंट रुल्सनुसार महापालिकेनेही आता ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील सहाही विभागात कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत सदरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
भारत सरकारच्या ई-वेस्ट मॅनेजमेंट नियमावलीनुसार, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील कच-याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे निर्माते, पुरवठादार, विक्रेते, पुनर्वापरायोग्य करणारे, घाऊक वापरकर्ते, रिसायकलर आदींच्या जबाबदा-या निश्चित करून दिलेल्या आहेत. शहरात महापालिकेने घनकचरा संकलनासाठी घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, परंतु घनकच-यामध्ये नागरिकांकडून निरूपयोगी ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूही घंटागाडीत टाकल्या जातात. या वस्तूंवर प्रक्रिया करता येत नसल्याने मोठ्या स्वरुपात ई-कचरा जमा होताना दिसून येत आहे. महानगरात निर्माण होणा-या घनकच-यात इलेक्ट्रॉनिक कचरा आढळून आल्यास तो व्यवस्थित वर्गीकरण करणे, जमा करणे व अधिकृत पुनर्वापर करणा-या संस्थेकडे पाठविण्याची व्यवस्था करणे हे भारत सरकारच्या नियमावलीनुसार बंधनकारक आहे. त्यासाठीच महापालिकेने शहरात जमा होणा-या ई-कच-याचे संकलन करण्यासाठी सहाही विभागात ई-वेस्ट कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अधिकृत पुनर्वापर व विल्हेवाट लावणा-या संस्थांमार्फतच सदर कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव असून संबंधित संस्थांकडून लवकरच त्यासंदर्भातील प्रस्ताव मागविले जाणार आहेत.
पर्यावरणाच्या समस्या
इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कच-याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. गंभीर आजारांचे स्त्रोत बनलेल्या या ई-कच-याचे भारतासारख्या विकसनशील देशांत बरेच जास्त प्रमाण आहे. घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून दिला जातो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही फेकला जातो. या कच-यात ई-कचराही असतो. मात्र, शहरात कलेक्शन सेंटर निर्माण झाल्यास नागरिकांना तो तेथे जमा करणे बंधनकारक असणार आहे.

Web Title:  Nashik Municipal Corporation decided to start e-waste collection center in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.