जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:28 AM2019-03-24T00:28:16+5:302019-03-24T00:28:50+5:30

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.

Jalgaon district highest number of copabahadar | जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

Next

नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. नाशिक विभागात एकूण २५३ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २३८ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. यात दहावी १२८, तर बारावीच्या ११० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तुलनेत नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची मात्र कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल होत असून, नाशिकमध्ये दहावीचे चार व बारावीचे चार असे एकूण आठ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.
नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने दहावी, बारावीच्या परीक्षेत आघाडी घेतली आहे. मात्र ही आघाडी चांगल्या कामासाठी नसून परीक्षेतील गैरप्रकारात असल्याने जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्था टीकेची लक्ष्य झाली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले. शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी विभागस्तरावर २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान तब्बल २३८ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सध्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.
जळगावच्या धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये अत्यल्प गैरप्रकार घडले आहेत. नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे दहावीचे केवळ तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले असून, बारावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. तर धुळ्यात दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नसून, बारावीच्या परीक्षेत केवळ ४ कॉपी प्रकरणे समोर आली, तर नाशिकमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येकी ४ असे एकूण ८ गैरप्रकार घडले आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा २० मार्चला संपली असून, १ मार्चपासून सुरू झालेली दहावीची परीक्षा शुक्रवारी (दि.२२) संपली आहे.
काही ठिकाणी ४ एप्रिलपर्यंत प्रात्यक्षिक परीक्ष सुरू राहणार आहे. मात्र लेखी परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी झाला असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालांचे वेध लागले आहे.
असे घडले कॉपी प्रकार
जिल्हा दहावी बारावी
नाशिक ०४ ०४
धुळे ०० ०४
नंदुरबार ०० ०३
जळगाव १२८ ११०
एकूण १३५ ११८

Web Title: Jalgaon district highest number of copabahadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.