गणेश मंडळांना अग्निशामककडून पाचशेचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:01 AM2018-08-30T01:01:36+5:302018-08-30T01:02:29+5:30

गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मंडप, वाद्य शुल्कासोबत आता अग्निशामक सेवेचा प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे धोरण मनपाने अवलंबिल्याने मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

 Ganesh Mandal's 500-odd refund from firefighters | गणेश मंडळांना अग्निशामककडून पाचशेचा भुर्दंड

गणेश मंडळांना अग्निशामककडून पाचशेचा भुर्दंड

Next

नाशिकरोड : गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मंडप, वाद्य शुल्कासोबत आता अग्निशामक सेवेचा प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे धोरण मनपाने अवलंबिल्याने मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १५ दिवसांवर गणेशोत्सव येऊनसुद्धा मनपा व पोलीस प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे एक खिडकी योजना सुरू न झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये परवानगीबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.  मनपा प्रशासनाच्या कायदेशीर परवानगीच्या नावाखाली आडमुठे धोरणामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मनपा व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयच नसल्यामुळे अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव परवानगी देण्याबाबत मनपा व पोलीस कर्मचारीच अनभिज्ञ असल्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. परवानगी नसेल तर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल होण्याच्या भीतीमुळे काही गणेश मंडळे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.  यापूर्वी मनपा विभागीय कार्यालयात गणेशोत्सव परवानगीचा अर्ज देण्याबरोबर पोलीस प्रशासनाकडेदेखील परवानगीचा रीतसर अर्ज देण्यात येत होता. पोलीस प्रशासनाच्या परवानगीनंतर उत्सवाचा मार्ग मोकळा होत होता. मात्र मनपा आयुक्तांनी नियमावर बोट ठेवत गणेशोत्सव मंडपासाठी ७५० रुपये शुल्क व प्रत्येक स्वागत कमानीसाठी ७५० रुपये शुल्क आकारून त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जात आहे. तर पोलीस प्रशासनाकडून वाद्य परवानगीकरिता प्रत्येक स्पिकरला २०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.  परवानगी घेताना मनपा प्रशासनाने मंडपाचा स्थळप्रत नकाशा, पोलीस प्रशासनाचा ना हरकत दाखला, शहर वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला, धर्मदाय आयुक्त कार्यालय नोंदणी प्रमाणपत्र, अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला मागितला आहे. तर पोलीस प्रशासन पहिले मनपाची परवानगी आणा असे सांगत आहे. तर मनपाचेच अग्निशामक विभाग वरील पाचही विभागांची परवानगी आणल्यावर ना हरकत दाखला देऊ, असे सांगत आहे. मनपा व पोलीस यांचा आपसांत ताळमेळ नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीच्या स्टॉलची जागा निश्चित करण्याबाबतचा घोळ सुरूच असल्याने मूर्ती विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परवानगीसाठीच सात-आठ हजार रुपये खर्च मंडळांना सोसावा लागण्याची सद्यस्थिती आहे. कायदेशीर परवानगीच्या फंडामुळे मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
शुल्क आकारणी कशासाठी?
अग्निशामक विभागाचा गणेशोत्सवासाठी ना हरकत दाखला परवानगीमध्ये मागितला आहे. अग्निशामक विभागाने सेवा शुल्क तात्पुरता दाखला शुल्क म्हणून प्रतिदिन ५०० रुपये नियमानुसार आकारणी करण्याचे पत्रक काढले आहे. त्यामुळे मंडळांना पाच हजार रुपये भरावे लागणार आहे. अग्निशामक विभागाकडून फक्त ना हरकत दाखला देण्यासाठी प्रतिदिन ५०० रुपये शुल्क आकारणी करणार आहे. मंडपाजवळ अग्निशामक विभागाकडून आग विझविण्याची कुठलीही व्यवस्था किंवा साहित्य दिले जाणार नाही. बाजारामध्ये आग विझविण्याचे साहित्य इतक्या रकमेत विकत मिळते. अग्निशामक केंद्र काही देणारच नसेल तर शुल्क आकारणी कसली करत आहे, असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

Web Title:  Ganesh Mandal's 500-odd refund from firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.