नाशिक महापालिकेतील स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:14 PM2018-02-14T19:14:56+5:302018-02-14T19:16:02+5:30

नियमानुसार प्रक्रिया पूर्ण : सेना नगरसेवकाकडून स्थगितीचा प्रयत्न

Eight members of standing committee of Nashik Municipal Corporation retired | नाशिक महापालिकेतील स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त

Next
ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाचे सर्वाधिक ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांना नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने निवृत्त करण्यात आले. त्यात, सत्ताधारी भाजपाचे सर्वाधिक ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी वकिलामार्फत नोटीस देत निवृत्तीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली परंतु, सभापतींनी केवळ नोंद घेत प्रक्रिया पूर्ण केली.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे नियमानुसार आठ सदस्यांना निवृत्त करण्याची प्रक्रिया सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीच आपल्या हस्ते चिठ्ठया काढत आठ जणांची निवृत्ती जाहीर केली. त्यात सत्ताधारी भाजपाचे शशिकांत जाधव, अलका अहिरे, जगदीश पाटील व मुकेश शहाणे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे आणि डी. जी. सूर्यवंशी तर कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि राष्टवादीचे राजेंद्र महाले यांचा समावेश आहे. त्यामुळे नियमानुसार, भाजपाचे शिवाजी गांगुर्डे, सीमा ताजणे, सुनिता पिंगळे, विशाल संगमनेरे आणि श्याम बडोदे, सेनेचे प्रवीण तिदमे व भागवत आरोटे आणि मनसेच्या कोट्यातून आलेले अपक्ष मुशीर सैय्यद यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. सत्ताधारी भाजपाने अधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी म्हणून उर्वरित सदस्यांचेही राजीनामे घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले असल्याने पाचही सदस्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी अद्याप याबाबतचा निर्णय झाला नसल्याचे सांगत शहराध्यक्षच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडूनही एक वर्षाचाच फार्मूला राबविला जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या कोट्यातून आलेले अपक्ष मुशीर सैय्यद यांना ठरल्याप्रमाणे पहिल्या आणि शेवटच्या वर्षी स्थायीचे सदस्यपद दिले जाणार असल्याने मुशीर सैय्यद यांच्याकडूनही मनसेकडून राजीनामा मागितला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेला नोटीस
शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी विद्यमान स्थायी समितीच्या सदस्यांना पूर्ण एक वर्षाचा कालावधी मिळावा म्हणून विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी यांनी महापालिकेला पत्र देत महाराष्ट महापालिका अधिनियम कलम २० मधील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. याशिवाय, तिदमे यांनी वकीलामार्फतही महापालिकेला नोटीस बजावत सदर निवृत्तीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. परंतु, सभापतींनी या दोन्ही पत्रांची नोंद घेत प्रक्रिया पूर्ण केली.

Web Title: Eight members of standing committee of Nashik Municipal Corporation retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.