दत्तू

By राकेशजोशी | Published: August 31, 2018 02:01 AM2018-08-31T02:01:15+5:302018-08-31T02:06:33+5:30

खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे साऱ्या जगाला तो माहीत झाला.

Dattu | दत्तू

दत्तू

googlenewsNext
ठळक मुद्देअंगात जिगर आणि मनात ऊर्मी ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर लष्करात नोकरीआता त्याचं लक्ष लागलं आॅलिम्पिककडे..

दत्तू
- राकेश जोशी
खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू.
रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक
केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे
साऱ्या जगाला तो माहीत झाला.
आत्ताही आशियाई स्पर्धेत
आजारपणामुळे त्याचं वैयक्तिक पदक हुकलं;
पण सांघिक प्रकारात त्यानं
जिद्दीनं सुवर्ण पटकावलंच.
त्याच्या जिद्दीचा प्रवास सोपा कधीच नव्हता..
दत्तू भोकनळ. अंगात जिगर आणि मनात ऊर्मी असली की काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्तू. हातातोंडाची गाठ घालता घालता आणि परिस्थितीशी झगडताना मेटाकुटीला येत असताना गरीब घरातील दत्तू आंतरराष्टÑीय पातळीवर काही कामगिरी करील असं कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. त्याच्या गावातल्याच काय, पण घरातल्यांनाही तसं कधी वाटलं नव्हतं. कोणाला माहीत होता हा दत्तू? पण २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये नौकानयनात त्याचं पदक सहा सेकंदांनी हुकलं आणि दत्तू अख्ख्या दुनियेला माहीत झाला. त्यामुळेच आत्ता आशियाई स्पर्धेतही साºया नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या; पण त्याचं वैयक्तिक पदक हुकलं. सहाव्या क्रमांकावर तो फेकला गेला. अर्थात याचं कारण होतं त्याची तब्येत. ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी पडला होता. त्याच्या अंगात ताप होता. यशानं त्याला हुलकावणी दिली.
याच कारणामुळे दत्तूला सांघिक प्रकारातूनही संघाबाहेर ठेवण्यात येणार होते, पण जिद्दी दत्तू हार मानायला तयार नव्हता आणि संघ व्यवस्थापनाचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दुसºयाच दिवशी झालेल्या सांघिक नौकानयन स्पर्धेत दत्तूला सहभागी करून घेण्यात आलं आणि दत्तूनंही आपल्यावरील विश्वासाला मग तडा जाऊ दिला नाही. या संघानं सुवर्णपदक जिंकलं आणि भारताच्या खात्यावर आणखी एका सुवर्णाची नोंद झाली.पण दत्तूला कोणतंच यश सहजासहजी मिळालं नाही. त्याचा आजवरचा प्रवास कायमच संघर्षानं भरलेला राहिला आहे.
तळेगाव रोही हे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जेमतेम दहा हजार लोकसंख्येचं गाव. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. अशा वातावरणात वाढलेल्या दत्तूचा एकमेव आधार म्हणजे त्याचा स्वत:वरचा विश्वास. आत्मविश्वास. त्याच बळावर त्यानं लहानपणीच आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदाºया केवळ समर्थपणे पेलल्याच नाहीत, तर या आत्मविश्वासाचं, जिद्दीचं रूपांतर यशातही केलं.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झालं. पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालयात झालं. दहावीत असतानाच वडील वारले. कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूनं मग ‘ज्येष्ठाची’ भूमिका पार पाडताना आईच्या मदतीने घरगाडा हाकला. मिळेल ते आणि पडेल ते काम करत घराचा गाडा हाकताना मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर २०१२ मध्ये लष्करात नोकरी मिळवली.
त्यावेळी त्याचं फारसं शिक्षणही झालेलं नव्हतं. सैन्य दलात असतानाच त्यानं बारावीची परीक्षा लासलगाव येथून दिली. लष्करात कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्दीच्या बळावर त्यानं नुसते प्रशिक्षणच नव्हे तर पुणे येथे नौकानयनाचे धडेही तितक्याच एकाग्रतेने गिरवले.
खरं तर लष्करात सरावाचा भाग म्हणून दत्तू बास्केटबॉल खेळायचा. मात्र त्याची उंची आणि शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. इथूनच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. नौकानयन म्हणजे काय, ते कसं करतात, त्याचं तंत्र काय, यातलं ओ की ठो दत्तूला माहीत नव्हतं, पण लवकरच त्यानं ते सारं आत्मसात केलं. अंगातील शिस्तीमुळे थोड्याच काळात त्यानं त्यावर वर्चस्व मिळवलं आणि तो त्यात चांगलाच रमलाही. या खेळातील बारकावे, तांत्रिक गोष्टी त्यानं मेहनतीनं शिकून घेतल्या. त्याचा अर्थातच अपेक्षित परिणाम झाला आणि भल्याभल्यांना मागे टाकत २०१४ साली त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर २०१५ साली चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावलं. २०१८च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले.
आपल्या कर्तबगारीमुळे आज दत्तू सगळ्यांना माहीत झाला आहे; पण त्याचं बालपण फारच कष्टात आणि गरिबीत गेलं.
५ एप्रिल १९९१ रोजी तळेगाव रोही येथील गरीब शेतकरी कुंटुबात त्याचा जन्म झाला. वडील बबन. विहिरी खोदाईचे काम करायचे. आयुष्यभर काबाडकष्टाचेच दिवस पाहिल्याने ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. दत्तू आणि आई आशा. यांच्यावरच मग साºया कुटुंबाची जबाबदारी आली. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कमाई करणं, घराला हातभार लावणं गरजेचं होतं. शारीरिक कष्टात कधीच माघार न घेतलेल्या दत्तूनं लष्करात प्रवेश मिळवला. आता आर्थिक आणि मानसिक चिंता मिटेल असं वाटत होतं; पण नशीब हात धुऊन दत्तूच्या मागं लागलं होतं.
आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तूची तयारी सुरू होती. दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अ‍ॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला होता. त्याचवेळी आई (आशाबाई ऊर्फ अक्का) घरात पाय घसरून पडली. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी तसं नव्हतं. मेंदूला मार लागल्याने आईला स्मृतिभंश झाला. कोणालाच ती ओळखू शकत नव्हती.
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा आईनं दत्तूला ओळखलेच नाही. ज्या आईवर दत्तूचं जीवापाड प्रेम, वडील गेल्यानंतर जिनं आपलं पालनपोषण केलं, ती आई आपल्याला ओळखू शकत नाही याचं दत्तूला खूप दु:ख झालं. हे दु:ख उराशी बाळगत आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवाना झाला. ऐन आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान ही घटना घडल्यामुळे नाही म्हटलं तरी दत्तू विचलित झाला. अर्ध लक्ष सरावाकडे, स्पर्धेकडे आणि अर्ध लक्ष आईकडे, अशी त्याची अवस्था झाली होती. स्पर्धा संपल्या संपल्या दत्तू परत घरी आला. पण लवकरच आई वारली.
जागतिक रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अवघ्या ६ सेकंदांच्या फरकाने पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडावं लागल्याचं दु:ख होतंच, त्यात आई गेली. पण त्यातून सावरत दत्तूने नव्या उमेदीने सुरुवात केली. यंदाच्या आशियाई क्र ीडा स्पर्धेत एकेरीच्या पदकानं त्याला हुलकावणी दिली; पण त्यामुळेच जिद्दीनं पेटून उठलेल्या दत्तूनं सांघिक प्रकारात देशाला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. हे पदक माझ्या आईसाठी आहे असं दत्तू सांगतो. या पदकानं त्याला पुन्हा नवी उमेद मिळवून दिली आहे. आता त्याचं लक्ष लागलं आहे ते आॅलिम्पिककडे..
 

 

Web Title: Dattu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.