आठ महिन्यांत ‘क्लस्टर’ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:37 AM2018-08-13T00:37:19+5:302018-08-13T00:37:36+5:30

जुने नाशिक अर्थात गावठाणाच्या विकासासाठी शासनाने वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) दिले तरी हा प्रश्न सुटणार नाही़ क्लस्टर अर्थात समुच्चय पद्धतीने विकासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, यासाठी वाडेमालक व भाडेकरू यांना एकत्र यावे लागणार आहे़ एकट्या-दुकट्याला हा विकास करता येणार नसून त्यासाठी सर्वांनाच एकत्र यावे लागणार आहे़ जुने नाशिक गावठाण विकासासाठी चार ते साडेचार वाढीव चटई क्षेत्र मिळावे यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत़ क्लस्टरसाठी जुन्या नाशिकमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास येत्या आठ महिन्यांत योजनेची अंमलबजावणी सुरू होऊ शकते, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले़

'Cluster' possible in eight months | आठ महिन्यांत ‘क्लस्टर’ शक्य

आठ महिन्यांत ‘क्लस्टर’ शक्य

googlenewsNext

नाशिक : जुने नाशिक अर्थात गावठाणाच्या विकासासाठी शासनाने वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) दिले तरी हा प्रश्न सुटणार नाही़ क्लस्टर अर्थात समुच्चय पद्धतीने विकासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, यासाठी वाडेमालक व भाडेकरू यांना एकत्र यावे लागणार आहे़ एकट्या-दुकट्याला हा विकास करता येणार नसून त्यासाठी सर्वांनाच एकत्र यावे लागणार आहे़ जुने नाशिक गावठाण विकासासाठी चार ते साडेचार वाढीव चटई क्षेत्र मिळावे यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत़ क्लस्टरसाठी जुन्या नाशिकमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास येत्या आठ महिन्यांत योजनेची अंमलबजावणी सुरू होऊ शकते, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले़
जुनी तांबट लेनमधील श्री कालिका मंदिरात रविवारी (दि़१२) दुपारी आयोजित करण्यात आलेल्या गावठाण विकास नियोजन बैठकीत फरांदे बोलत होत्या़ त्या पुढे म्हणाल्या की, सुमारे वीस वर्षांपासून जुने नाशिक गावठाण विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे़ गावठाणचे २५ टक्के क्षेत्र हे नदीकिनारी असून, पूररेषा ही कमी करता येत नाही,

आठ महिन्यांत ‘क्लस्टर’ शक्य
(पान १ वरून)

मात्र पूरप्रभाव हा कमी करता येतो़ त्यासाठी आनंदवली, सातपूर या ठिकाणचे पूल व बंधारे पाडण्याबरोबरच होळकर पुलाखालील काँक्रिटीकरण काढून या ठिकाणी मॅन्युअल गेट तयार केले जाणार आहे़ तसेच गावठाणाच्या विकासासाठी क्लस्टर योजना व पूररेषेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत यापूर्वीच बैठक झालेली आहे़ गावठाणातील जुन्या धाटणीचा विचार करून क्लस्टर योजना तयार करावी़ त्यामध्ये पार्किंग, मोठे रस्ते, उद्याने, व्यायामशाळा या सर्वच बाबींचा अंतर्भाव असावा यासाठी चार ते साडेचार वाढीव चटई क्षेत्र मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे फरांदे यांनी सांगितले़
प्रारंभी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मंडलेश्वर काळे यांनी गावठाणाच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले़ शहराच्या आजूबाजूचा विकास झाला मात्र जुने नाशिक विकासापासून वंचित राहिले़ साक्षात मृत्यू समोर दिसत असूनही नागरिक वाड्यांमध्ये राहतात कारण त्यांची अपरिहार्यता आहे़ घरमालक, विकासक व भाडेकरू या तिघांचाही क्लस्टरमध्ये फायदा होणार असल्याचे सांगितले़ महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी गावठाण विकास अहवालास एकजुटीने मदत करण्याचे तसेच विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले़ प्रारंभी वाडा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या समर्थ काळे व करण घोडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़
व्यासपीठावर माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, विजय साने, प्रा़ सुहास फरांदे, प्रतीक कर्पे उपस्थित होते़ प्रास्ताविक मंडलेश्वर काळे यांनी केले तर आभार प्रतीक शुक्ल यांनी मानले़ या बैठकीचे सूत्रसंचालन भाजपाचे गणेश मोरे यांनी केले़ या बैठकीस जुने नाशिकमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़

—कोट—
घरमालक-भाडेकरूंसाठी लाभदायी योजना
क्लस्टर योजनेसाठी घरमालक व भाडेकरू यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे़ यामध्ये ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींचा समावेश करता येणार असून भाडेकरूंकडे किमान बारा वर्षांपूर्वीचे पुरावे गरजेचे असून यामध्ये २५ टक्के झोपडपट्टीतील जागेचा वापर केला जातो़ घरमालक एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी तयार करून स्वत: विकास करू शकतो किंवा विकसनासाठी देऊ शकतात़ प्रत्येक शहराच्या रचनेनुसार इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट रिपोर्ट तयार केला जातो, त्यामध्ये बांधकाम कसे असेल, त्यासाठीचा निधी, सोयीसुविधा यांचा अंतर्भाव असतो़ क्लस्टरमधील समाविष्ट नवीन बांधकाम झालेल्यांना ते पाडण्याची आवश्यकता नाही़ तसेच या ठिकाणच्या रहिवाशांना निवासी व वाणिज्य वापर असेल तर वाणिज्य मोबदला मिळेल़ किमान दोन ते तीन मजले पार्किंगसाठी राहणार असून पूररेषेची कोणतीही समस्या नाही़ तसेच ३० टक्के नागरिकांचा विरोध असेल तरीही ही योजना राबविता येते़
- प्रतिभा भदाणे, सहसंचालक, नगररचना

दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
जुनी तांबट लेनमध्ये वाडा कोसळल्याने समर्थ काळे व करण घोडके या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली़ या युवकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून येत्या चार-पाच दिवसांत पाच लाखांची मदत दिली जाणार आहे़ यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी बैठकीत सांगितले़
—इन्फो—
क्लस्टर योजनेबाबत नागरिकांच्या शंका
१़ वाडा दुर्घटनेनंतर सुमारे पंधरा वाडे खाली झाले असून, घरमालक व भाडेकरू यांच्यासाठी ही क्लस्टर योजना राबविली तर त्यांच्यातील वाद मिटतील व विकासासाठी सर्व वाडे हे रिकामे होतील़ या दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या मदतीसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन दिले जावे़
- शंकर बर्वे, नागरिक

२़ जुने नाशिक गावठाणाच्या विकासासाठीची क्लस्टर योजना राबविताना भाडेकरूंची सोय केली जावी़ तसेच या योजनेसाठी अनेक वाडेधारकांना एकत्र आणावे लागेल, मात्र ते शक्य नाही़ या ठिकाणचे नागरिक गरीब व भावनिक असून या परिसराकडे आतापर्यंत व्यवस्थित लक्ष देण्यात आले नाही़
- नंदन भास्करे, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस

३़ गावठाणातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने विकासकांनी त्यांना मोबदला देण्याची आवश्यकता आहे़ तसेच त्यांची आर्थिक कुवत नसल्याने त्यांना कर्ज मिळेल का हादेखील प्रश्न आहे़ वाढीव चटई क्षेत्रानंतर त्याच्या जागेचे मूल्य ठरवून त्यास भरपाई मिळावी़
- सचिन देव, नागरिक

४़ जानेवारी २०१६ पर्यंत बांधकामे ही दोन वाढीव चटईक्षेत्रानुसार झाली तर त्यानंतरची दीड चटईक्षेत्रानंतर झाली़ यामुळे जागामालकांचे ३० टक्के जागेचे नुकसान झाले असून, क्लस्टर योजना सुरू होईपर्यंत किमान दोन चटईक्षेत्र लागे करावे़
- रमेश गायधनी, नागरिक

५़ पूररेषेतील वाडेमालकांना कोणतीही बँक कर्जपुरवठा करीत नाही वा प्रशासन परवानगी देत नाही़ त्यामुळे क्लस्टरसाठी अर्थपुरवठा व परवानगी मिळेल का हा प्रश्नच आहे़
- स्वाती कुलकर्णी, नागरिक

६़ वाडा दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत केली जात आहे़ ही मदत अत्यंत तोकडी असून यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे़ या बैठकीस केवळ दहा टक्के नागरिक आले आहेत. सर्वांना एकत्र करून आणखी बैठक घेतली जावी़
- दिनेश चव्हाण, नाागरिक

Web Title: 'Cluster' possible in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक