प्रामाणिक रिक्षाचालकांना आता विशेष स्टिकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:35 AM2019-06-23T00:35:28+5:302019-06-23T00:36:07+5:30

रिक्षा प्रवासात मौल्यवान दागिने, रोख रक्कम चोरीसोबत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायामध्ये शिरलेली गुन्हेगारी अपप्रवृत्ती ठेचून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याशी साधलेला संवाद ...

 Authentic rickshaw drivers now special stickers! | प्रामाणिक रिक्षाचालकांना आता विशेष स्टिकर !

प्रामाणिक रिक्षाचालकांना आता विशेष स्टिकर !

googlenewsNext

शहरातील रिक्षा व्यवसायाविषयी काय सांगाल?
शहरात तीन ते चार हजार रिक्षाचालक असून, त्यांच्यामध्ये बहुतांश रिक्षाचालक हे कुटुंबवत्सल असेच आहे; मात्र काही गुन्हेगारांनी रिक्षा व्यवसायाची सहानुभूती मिळविण्यासाठी या व्यवसायात प्रवेश केल्याचेही आढळून आले आहे. यामुळे अशा अपप्रवृत्तीचे रिक्षाचालक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. कारण अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या काही रिक्षाचालकांमुळेच शहरात गुन्हे घडत असून, रिक्षा व्यवसायाची प्रतिमाही डागाळली जात आहे.
गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
शहरातील गुन्हेगार रात्रीच्या वेळी रिक्षा चालवून पैसे कमवित असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहर वाहतूक शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना आदेशित करून अचानकपणे नाकाबंदी व झडतीसत्र राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांची अचाकपणे तपासणी दोन्ही परिमंडळांमध्ये सुरू आहेत. अद्याप चार हजारांपेक्षा अधिक रिक्षा पोलिसांनी तपासल्या आहेत. जे रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर कायदेशीरपणे कारवाई केली जात आहेत.
चांगले रिक्षाचालक नक्की ओळखणार कसे?
शहर वाहतूक शाखेकडून पोलिसांचा लोगो असलेले एका विशिष्ट प्रकारचे स्टिकर तयार करण्यात आले आहे. जे रिक्षाचालक वाहतूक नियमांचे पालन करतात तसेच त्यांचा पूर्वइतिहासही योग्य आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा रिक्षाचालकांच्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या रिक्षांना स्टिकर लावण्यात आले आहेत. या स्टिकरवरून प्रवाशांना चांगले रिक्षाचालक ओळखणे सोपे होईल.
रिक्षांमध्ये बसून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे का?
रिक्षाचालकांची दिशाभूल करून प्रवासाचा बनाव करून नागरिकांची रिक्षामध्ये लूट करणारी टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघा सराईत गुन्हेगारांना म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारचे घडलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. ११ तोळे ४ ग्रॅम सोने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे.
रिक्षा व्यवसाय हा सर्वसामान्यांचा ‘आधार’ आहे. रिक्षामधून ये-जा करणारे प्रवासीदेखील सर्वसामान्य आहेत. रिक्षाचालकदेखील सर्वसामान्य असून, ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर करतात. बहुतांश रिक्षाचालक ‘शिल्लक’वर रिक्षा चालवून मालकाला भाडे देऊन त्यातून आपल्या संसाराची गरज भागवितात. त्यामुळे रिक्षाचालकांनी सजग राहून रिक्षांमधून गुन्हेगारी घडणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी.
प्रतिमा उंचविण्यासाठी पुढाकार घ्या
शहरात तीन ते चार हजार रिक्षाचालक आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचा त्यांच्यावर विश्वास असून, काही अपप्रवृत्तींचा शिरकाव या व्यवसायात झाल्याने प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी पोलिसांना योग्य ते सहकार्य करत अपप्रवृत्ती ठेचण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नाशिक ही धार्मिक पुण्यनगरी असून, येथील रिक्षा व्यवसाय आदर्श ठरू शकतो. त्यासाठी गरज आहे, ती चांगल्या रिक्षाचालकांनी पुढे येण्याची. पोलीस नेहमीच त्यांच्यासोबत असून, प्रतिमा उंचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे.

Web Title:  Authentic rickshaw drivers now special stickers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.