नाशिक महापालिकेतील २५७ कोटींचे रस्ते विकास अडचणीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:41 PM2018-02-10T14:41:07+5:302018-02-10T14:41:58+5:30

महापालिका : तुकाराम मुंढे यांनी शहर अभियंत्यांकडून मागविली माहिती

 257 crores road development problems in Nashik municipal corporation? | नाशिक महापालिकेतील २५७ कोटींचे रस्ते विकास अडचणीत?

नाशिक महापालिकेतील २५७ कोटींचे रस्ते विकास अडचणीत?

Next
ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाकडून महासभेत जादा विषयाच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा प्रस्ताव मंजूरसदर प्रस्तावाबाबत मुख्य लेखापालासह मुख्य लेखापरीक्षकांनी प्रतिकूल अभिप्राय नोंदविला असतानाही मावळते आयुक्त यांनी त्यास हिरवा कंदील

नाशिक - नियमांच्या चौकटीत राहून आवश्यकतेनुसारच प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केल्यामुळे, सत्ताधारी भाजपाने विरोधकांना मधाचे बोट लावत आवश्यकता नसतानाही मागील दाराने मंजूर केलेली २५७ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासाची कामे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंढे यांनी सदर रस्ते विकासाच्या कामांबाबतची माहिती शहर अभियंत्यांकडून मागविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सत्ताधारी भाजपाकडून महासभेत जादा विषयाच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाबाबत मुख्य लेखापालासह मुख्य लेखापरीक्षकांनी प्रतिकूल अभिप्राय नोंदविला असतानाही मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे, आयुक्तांचीही भूमिका संशयास्पद ठरली होती. आयुक्तांनी सदरची कामे ही पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींतूनच होतील, असे स्पष्ट करत बचावाचा पवित्रा घेतला होता. तर सत्ताधारी भाजपाकडून प्रशासनावर राजकीय दबाव टाकत सदर कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याला गति देण्यात आली. त्यानुसार, खूप निकड नसतानाही बांधकाम विभागाने २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. सदर कामांमुळे महापालिकेचा स्पीलओव्हर ८५० कोटींवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांची बदली झाल्यानंतर पुन्हा एकदा २५७ कोटी रूपयांच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली आहे. सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दराच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जात असल्याने कामांच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त होऊ लागला आहे. त्यात आता तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, कामांची निकड आणि त्यांचा शक्य-शक्यता अहवाल तपासूनच नियमांच्या चौकटीत राहून मंजुरी देण्याचे धोरण राबविणार असल्याचे स्पष्ट केल्याने मागील दाराने अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही मंजूर करण्यात आलेल्या २५७ कोटी रुपयांचा रस्ते विकासाला कात्रजचा घाट दाखविला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत, तुकाराम मुंढे यांनी २५७ कोटी रुपयांच्या या कामांबाबतची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांच्याकडून मागविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
...तर बजेट कोलमडणार!
आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मावळते आयुक्तांच्या पावलावर पाऊल ठेवत सदर कामांना पुढे चाल दिली तर महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात आवश्यकता नसतानाही रस्ते विकासाचा हा घाट घालण्यात आलेला आहे. लेखा विभाग आणि लेखा परीक्षक विभागाने त्यास हरकत घेऊनही हा प्रपंच थाटण्यात आला. राजकीय दबावाला मावळते आयुक्त बळी पडल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

Web Title:  257 crores road development problems in Nashik municipal corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.