नांदेड जिल्ह्यात शाश्वत सिंचन कागदावरच; उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळे योजनेचे जिल्ह्यात अवघे २९ टक्के काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:02 PM2017-12-29T17:02:39+5:302017-12-29T17:05:11+5:30

नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

On permanent irrigation paper in Nanded district; Compared to the target, only 29 per cent of the work of the scheme is in the district | नांदेड जिल्ह्यात शाश्वत सिंचन कागदावरच; उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळे योजनेचे जिल्ह्यात अवघे २९ टक्के काम 

नांदेड जिल्ह्यात शाश्वत सिंचन कागदावरच; उद्दिष्टाच्या तुलनेत शेततळे योजनेचे जिल्ह्यात अवघे २९ टक्के काम 

googlenewsNext
ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़

- विशाल सोनटक्के 
नांदेड :
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला़ मात्र शेतकर्‍यांनी अर्ज करूनही त्यांना शेततळे मिळत नसल्याचे चित्र नांदेडसह राज्यभरात दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यात तर या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्‍या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ 

राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे़ त्याचबरोबर ते अनिश्चितही आहे़ यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील मोठ भूभाग पूर्णत: पावसावर अवलंबून असल्याने पावसाने ओढ देताच त्याचा पिकावर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते़ तीन वर्षापूर्वी मराठवाड्याला अत्यल्प पर्जन्यमानामुळे अशाच तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता़ या दौर्‍यावेळी पाणीटंचाई व त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी विविध ठिकाणच्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

 त्यामुळेच मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून  जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याची घोषणा केली़ प्रायोगिक तत्त्वावर शेततळी घेतलेल्या ठिकाणच्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे निदर्शनास आले असून शेततळ्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात शाश्वतता आल्याचे सांगत ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी काढले होते़ मात्र नांदेड जिल्ह्यातील चित्र पाहिल्यानंतर प्रशासनाने ही योजना गांभीर्याने घेतलेली नसल्याचे दिसून येते़ 

मागेल त्याला शेततळे योजना जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला़ एकट्या नांदेड जिल्ह्यातून सात हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी शेततळ्यांसाठी अर्ज दाखल केले़ यावर ४ हजार ८८४ शेततळ्यांना मंजुरी देवून प्रशासनाने कार्यारंभ आदेशही जारी केले़ मात्र वर्ष उलटत आले तरी शेततळ्यांची ही कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही़ कार्यारंभ आदेश जारी झाल्यानंतर कृषि विभागाने ४ हजार ८७७ शेततळ्यांची आखणीही करून दिली़ मात्र त्यातील अवघ्या १ हजार १४३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून सद्यस्थितीत ८८ शेततळ्यांची कामे सुरू असल्याने नांदेड जिल्ह्याने ४ हजार शेततळी बांधण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यातही नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि उमरी या सहा तालुक्यांत सद्यस्थितीत शेततळ्याचे एकही काम सुरू नसल्याचे विदारक चित्र आहे़ 

सहा तालुक्यात योजनेची कामे ठप्प
शेततळ्यांसाठी शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत असला तरी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील तब्बल सहा तालुक्यात एकही काम सुरू नसल्याचे आॅक्टोबर अखेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, बिलोली, किनवट, माहूर आणि हिमायतनगर या तालुक्यांचा समावेश आहे़ इतर तालुक्यातील परिस्थिती  समाधानकारक नाही़  मुदखेड, देगलूर, हदगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी एक काम सुरू आहे़ तर कंधार, भोकरमध्ये अवघी दोन कामे सुरू आहेत़ मुखेड व उमरी तालुक्यात प्रत्येकी २३ कामे सुरू आहेत़ 

१,११,१११ चा आकडा गाठणार कसा?
प्रारंभी राज्य शासनाने ठराविक जिल्ह्यात सदर योजना राबविण्यास मंजुरी दिली होती़ त्यावेळी ५१ हजार ५०० शेततळी राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते़ मात्र या योजनेसाठी शेतकर्‍यांतून तब्बल १ लाख ४७ हजार ७१० एवढे अर्ज प्राप्त झाले़ हा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचे जाहीर करीत सुधारित लक्ष्यांकही १,११,१११ एवढा केला़ मात्र नांदेडसह बहुतांश जिल्ह्यांत मागेल त्याला शेततळे देण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते़ 

आखणी केल्यानंतरही कामाला गती मिळेना
४८८४ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर ४८७७ शेततळ्यांचे आखणी करून देण्यात आली़ मात्र त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही़ 

योजनेची अशी आहे तालुकानिहाय स्थिती 
 

तालुका     कार्यारंभ    पूर्ण झालेली    उद्दिष्टाची 
                आदेश         कामे             टक्केवारी

नांदेड         ९७               १६                 १३ %
अर्धापूर      ८८               ११                    ९ %
मुदखेड     १२०                २                   २ %
लोहा         ४०१           १५२                 ५४ %
कंधार       ३४२          १०१                   २८ %
देगलूर      ३२१           ११०                   ३९ %
मुखेड       ३२५           ६५                   १७ %
नायगाव   २९१            ३३                   १२ %
बिलोली    १४८           २५                   १४ %
धर्माबाद    ६५           ३७                   ४६ %
किनवट     ८१५       १३६                    २६ %
माहूर        २७१         ४३                    ३१ %
हदगाव     ९२२        २८१                   ४८ %
भोकर      २६३         ४८                    २७ %
हिमायतनगर  २५५        ४७             २१ %
उमरी        १६०         ३६                     २३ %
एकूण    ४८८४      ११४३                   २९ %

Web Title: On permanent irrigation paper in Nanded district; Compared to the target, only 29 per cent of the work of the scheme is in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.