आंतरराष्ट्रीय कलावंत जेठवाणींचे लिंग परिवर्तन; 'भरत' आता ओळखला जाणार 'सान्वी' नावाने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 05:37 PM2022-04-25T17:37:35+5:302022-04-25T18:00:29+5:30

धाडसी निर्णय घेत दिल्लीतील खासगी रुग्णालयात केली शस्त्रक्रिया

Gender reassignment of international Dancer Dr. Jethwani; 'Bharat' will now be known as 'Sanvi' | आंतरराष्ट्रीय कलावंत जेठवाणींचे लिंग परिवर्तन; 'भरत' आता ओळखला जाणार 'सान्वी' नावाने

आंतरराष्ट्रीय कलावंत जेठवाणींचे लिंग परिवर्तन; 'भरत' आता ओळखला जाणार 'सान्वी' नावाने

googlenewsNext

- श्रीनिवास भोसले
नांदेड :
मुलगा म्हणून जगताना आपण स्त्री असल्याची भावना डॉ. भरत जेठवाणी यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी समाज, कुटुंब काय म्हणेल याचा विचार न करता धाडसाने लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याने आता 'भरत' हा स्त्रीच्या रूपात 'सान्वी जेठवाणी' या नावाने ओळखला जाणार आहे.

लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज मनात येत असलेल्यांना वैद्यकीय भाषेत जेंडर सायफोरिया असे संबोधले जाते. अशा व्यक्ती आपले लिंग परिवर्तन करून घेऊ शकतात, तसा त्यांना कायद्याने अधिकार दिला आहे. यास लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रिया (एसआरएस) असे म्हणतात. कायद्यासह लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेची माहिती घेऊन डॉ. भरत जेठवाणी यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली असून, त्यांनी आता सान्वी या नावाने आपल्या नवजीवनाची सुरुवात केली आहे. जेठवाणी ही नांदेडची पहिली परिवर्तीत महिला ठरली आहे.

तब्बल १८ तासांच्या सात सर्जरी
लिंग परिवर्तनाची किचकट आणि अवघड शस्त्रक्रिया आहे. डॉ. जेठवाणी यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दोन टप्प्यांत शस्त्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात तब्बल ११ तास, तर दुसरी शस्त्रक्रिया वीस दिवसानंतर सहा तास चालली. एकूण १८ तासांमध्ये जेठवाणी यांच्यावर सात सर्जरी करण्यात आल्या.

समाजाची कायमच ऋणी, लग्नही करणार : सान्वी
नांदेडकरांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने मला नेहमीच साथ दिली म्हणून मी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करू शकले. लिंग परिवर्तनानंतर समाज काय म्हणेल याचा मी जास्त विचार केला नाही. परंतु, ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली ते यापुढेही निश्चितच देतील. भूतकाळ अन् भविष्यकाळ स्वीकारणारा समजदार जोडीदार मिळाला तर निश्चितच लग्न करणार आहे. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होतील किंवा नाही, याची खात्री डॉक्टरांनादेखील नव्हती. परंतु, मी मोठ्या धाडसाने हा निर्णय घेऊन शस्त्रक्रिया केली. त्यात आज स्त्री म्हणून मी लग्नानंतर माझ्या जोडीदारास सर्वस्व देऊ शकते. मात्र, मला संतती प्राप्त होणार नाही. त्यामुळे जो कोणी मूल होणार नाही, ही बाब स्वीकारून लग्नास तयार झाला तर लग्नाचा विचार करेल.
- डॉ. सान्वी जेठवाणी, कलावंत

दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये ललिताचा ललितकुमार...
बीडच्या पोलीस दलात महिला म्हणून भरती झालेल्या ललिता साळवे यांनी शरीरातील हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला. नोकरीत असल्यामुळे त्यांना विविध परवानग्या घेऊन सदर शस्त्रक्रिया करावी लागली होती. लिंग बदलानंतर ललिताचा ललितकुमार होऊन त्यांनी सीमा यांच्यासाेबत संसार थाटला आहे.

लावणीवर डॉक्टरेट
गेल्या अनेक वर्षापासून लावणीत वेगवेगळे प्रयोग करून पारंपरिक लावणीचा प्रसार भारतात आणि विदेशात केलेला आहे. लावणीसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील डॉ. जेठवाणी यांना प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने लावणी सम्राट, नृत्य शिरोमणी, भारतीय नृत्य रत्न आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जेठवाणी यांनी लावणीवरच पीएच. डी. देखील केलेली आहे.

Web Title: Gender reassignment of international Dancer Dr. Jethwani; 'Bharat' will now be known as 'Sanvi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.