नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून चिखलीकर, खतगावकर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:17 AM2019-03-14T00:17:51+5:302019-03-14T00:19:30+5:30

काँग्रेसकडून नेमके कोण निवडणूक रिंगणात उतरते, त्यावरच भाजपाचा उमेदवारही ठरणार आहे.

Chikhlikar, Khatgaonkar from BJP? | नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून चिखलीकर, खतगावकर ?

नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून चिखलीकर, खतगावकर ?

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक पक्षश्रेष्ठींनी काढायला सांगितली ना हरकत प्रमाणपत्रे

विशाल सोनटक्के

नांदेड : लोकसभेसाठी काँग्रेसने आ. अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे. दुसरीकडे ऐनवेळी खा. अशोकराव चव्हाण हेही लोकसभेच्या मैदानात उतरु शकतात. काँग्रेसकडून नेमके कोण निवडणूक रिंगणात उतरते, त्यावरच भाजपाचा उमेदवारही ठरणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा पक्षश्रेष्ठी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जि. प. सदस्या मीनल खतगावकर यांच्या नावाचाही विचार करत असून पक्षाने या दोघांनाही नाहरकत प्रमाणपत्रे काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेड मतदारसंघात जिल्हा काँग्रेसकडून आ. अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, खा. अशोकराव चव्हाण हेही ऐनवेळी लोकसभेच्या रिंगणात उतरु शकतात. तसे संकेतही अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीच दिले आहेत. आ.अमिता चव्हाण यांचे नाव पुढे आल्यानंतरही भाजपाकडून उमेदवारीवर केवळ चर्चाच सुरु आहे. आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह संतुक हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख आदींनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावलेली असतानाच आता भाजपा पक्षश्रेष्ठींनीही डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसप्रमाणेच भाजपानेही लोकसभा उमेदवारीसाठी फार्म्युला तयार केला आहे. अशोकराव चव्हाण लोकसभेच्या मैदानात उतरल्यास आ. प्रताप पाटील चिखलीकर तर आ. अमिता चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात मीनल खतगावकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मीनल खतगावकर यांचे नाव यानिमित्ताने प्रथमच खासदारकीसाठी पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच भाजपाकडूनही लगेच उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ ला मिळालेल्या माहितीनुसार भाजपा पक्षश्रेष्ठींनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह मीनल खतगावकर यांनाही उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असणारी नाहरकत (नोड्यूज) प्रमाणपत्रे काढून घेण्याच्या सूचना दिल्या असून या दोन्हीही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार नाहरकत प्रमाणपत्रे काढण्यास सुरुवातही केली आहे.

दरम्यान, या घडामोडीबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण विधानसभेसाठीच इच्छुक आहोत. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करु, असे त्यांनी स्पष्ट केले. नाहरकत प्रमाणपत्राबाबत विचारले असता होय, सर्व प्रकारची नाहरकत प्रमाणपत्रे काढली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा उमेदवारीवरुन भाजपात खल सुरु असून उमेदवाराची अंतिम निवड करण्यापूर्वी अनेक अंगाने पक्षश्रेष्ठी विचार करत आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारीसंदर्भातही चर्चा होत आहे. नांदेड जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ असल्याने काँग्रेसबरोबरच भाजपा पक्षश्रेष्ठींनीही जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. सद्य:स्थितीत भाजपाकडे जिल्ह्यातील एकमेव मुखेड मतदारसंघ आहे. या मतदारसंघाबरोबरच नायगाव मतदारसंघ भाजपाला हवा आहे. तर युतीतील शिवसेना नायगाव सोडल्यास किनवट मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे कळते. या संदर्भातही मुंबईमध्ये होत असलेल्या बैठकांत चर्चा झडत आहेत.
 

भाजपाच्या बैठकांवर बैठका
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण अथवा आ. अमिता चव्हाण यांच्यापैकीच एक उमेदवार निवडणूक लढणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. या बाबतीत भाजपामध्ये चर्चेवर चर्चा सुरु आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असून अखेरच्या क्षणी नांदेड लोकसभेसाठी ते कोणाला मैदानात उतरवितात, याकडे भाजपा कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

Web Title: Chikhlikar, Khatgaonkar from BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.