उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:52 AM2018-01-01T09:52:40+5:302018-01-01T09:55:56+5:30

‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले.

Winter Capital Welcomes to New Year 2018 | उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांकडून गुलाबाचे फूल वाहतूक पोलीस म्हटले की हातात पावतीबुक घेऊन सिग्नल तोडला की खिशाला कैची लावणारी व्यक्ती अशीच वाहतूक पोलिसांची प्रतिमा वाहनचालकांच्या मनात असते. परंतु ही प्रतिमा मोडित काढत शहराच्या विविध चौकात वाहतूक पोलिसांनी नागरिकांना एक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने नवीन विचारांचे, नवसंकल्पाचे स्वागत करण्यासाठीची उत्सुकता याहीवेळी दिसली. गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना  तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता. नवीन वर्षाच्या स्वागताला अधीर झालेल्या तरुणाईचे जत्थे फुटाळा चौपाटीवर रात्री ८ पासून पोहोचायला लागले होते. इकडे धरमपेठ, रविनगर, सदर परिसरातही अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. सक्करदरा, मेडिकल, रेशीमबाग, दिघोरी या भागातही नववर्षांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. अखेर घड्याळाने १२ चा गजर केला अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी एकच जल्लोष करीत नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. डीजेचा आवाज वाढला, पावले थिरकायला लागली आणि हॅप्पी न्यू इयरच्या सादेने अवघा आसमंत दणाणून गेला. आतषबाजीच्या नेत्रदीपक रोषणाईत शहरात जणू ऐन मध्यरात्री सूर्य उगवला होता. डीजेच्या दणदणाताट बोचऱ्या थंडीतही तरुणाईने लुंगी डान्सवर जोरदार फेर धरला.

मॉल्समध्ये विक्रमी गर्दी
शहरातील अनेक हॉटेल्स, मॉल्स,गार्डन रेस्टारंटनी नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पॅकेजेस जाहीर केले होते. इंटरनेटवर त्याचे जोरदार प्रमोशन झाल्याने अनेक ठिकाणचे बुकिंग हाऊसफुल्ल होते. रात्री उशिरापर्यंत येथे खरेदी व मौजमस्ती सुरू होती. या दिवशी खरेदीचा ग्राफ वाढणार हे स्पष्ट असल्याने अनेक मॉल्समध्ये नवनवीन व आकर्षक वस्तूंची मोठी रेंज उपलब्ध करण्यात आली होती. यात कपड्यांपासून घड्याळ, परफ्युम, मोबाईल फोनचा समावेश होता. शहरातील केक शॉपनी खास थर्टी फर्स्टसाठी विशेष आॅफर सुरू केली होती. नवीन वर्षाच्या स्वागताची संकल्पना केकवर साकारण्यात आली होती. शहरातील अनेक केक शॉपमध्ये मोठी गर्दी दिसत होर्ती.

 कुटुंबासह धार्मिक पर्यटन
नववर्षाचे स्वागत करताना डान्स, मस्ती, मद्य आणि फटाक्यांची आतषबाजी करणे असेच प्रकार घडतात या समजाला अनेकांनी फाटा दिला. खास थर्टी फर्स्टचे निमित्त साधून अनेकजण सहकुटुंब धार्मिक पर्यटनाला गेले. पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी, शेगाव, तिरुपती यासोबतच शहराजवळचे आदासा, आंभोरा पारडशिंगा याठिकाणी अनेकांनी पूजाअर्चा करून सरत्या वर्षाला निरोप दिला.

वेगाची हवेशी स्पर्धा
शहरातील इटर्निटी मॉल, एम्प्रेस मॉल, पुनम चेंबर, बिग बाजार या परिसरातील रस्ते गजबजून गेले होते. महाल, गांधीबाग, इतवारा परिसरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. परंतु सीताबर्डी, धरमपेठ, सदर, बजाजनगर या परिसरात तरुणाईची धूम दिसून आली. वाहनांचा वेग हवेशी स्पर्धा करीत होता. नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रस्त्यावर ओसंडून वाहत होता. धावत्या वाहनांवर सेल्फीचा थरारही रस्त्यावर अनुभवायला मिळाला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तानंतरही तरुणाईचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. 

सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
नवीन वर्षाच्या स्वागताची सोशल मीडियावरही जय्यत तयारी झाली होती. घड्याळाने १२ चा गजर करताच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक आदी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडायला लागला. तरुणाईत तर शुभेच्छा देण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू होती. नवीन वर्षाची विविध छायाचित्रे असलेल्या संदेशांचा यामध्ये समावेश होता. काहींनी नववर्षाच्या स्वागताचा व्हिडीओ बनवून तो आपल्या मित्रांना-नातेवाईकांना पाठवला. शुभेच्छा संदेशांनी रात्रभर लोकांचे मोबाईल खणखणत होते.
 

Web Title: Winter Capital Welcomes to New Year 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.