दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:48 AM2018-08-06T10:48:54+5:302018-08-06T10:49:55+5:30

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही.

When will divyang students get benefit of 3% in marks? | दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाने दीड वर्षं अगोदर घेतला होता निर्णय

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने उच्च शिक्षण संस्थामध्ये त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गतच अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्रातील प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पद्धती वेगळी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक मूल्यमापनात आवश्यक सोई सवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासनाने विशेष समिती नमली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर शासनाने ४ मार्च २०१७ रोजी निर्णय निर्गमित केले होते. यात जवळचे परीक्षा केंद्र, लेखनिकाची व्यवस्था, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ, आरोग्य-शारीरिक शिक्षण विषयांत सूट देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे गुण कापण्यात येऊ नये तसेच हजेरीमधील सूट इत्यादींचा समावेश होता. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचा एक प्रमुख निर्णय होता. ही सवलत एकाच विषयात किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांनी तात्काळ करावी, असे निर्देश शासनाने दिले होते. नागपूर विद्यापीठाने लेखनिक व परीक्षेमध्ये २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यासंदर्भात तर निर्णय घेतला व त्यांची अंमलबजावणी मागील सत्रातील परीक्षेपासून केली. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

अभ्यास मंडळाला घ्यावा लागणार निर्णय
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता शैक्षणिक मूल्यमापनातील बदल हे अभ्यास मंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने लेखनिक देणे किंवा परीक्षेत अतिरिक्त वेळ देणे या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. मात्र तीन टक्के गुणांची सूट देण्याच्या मुद्याला अभ्यास मंडळ व त्यानंतर विद्वत् परिषद यांची मंजुरी आवश्यक आहे. परीक्षा मंडळात यावर मोहोर लागल्यानंतर विद्यापीठ यावर पावले उचलेल, असे डॉ. खटी यांनी सांगितले. विद्यापीठात अनेक दिवस अभ्यासमंडळेच नव्हती. ती आता अस्तित्वात आली असून लवकरच पुढील प्रक्रिया विद्या विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: When will divyang students get benefit of 3% in marks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.