भर पावसाळ्यात विदर्भात २३८ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 08:46 PM2018-07-06T20:46:57+5:302018-07-06T20:47:06+5:30

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सरासरी पार

Water supply to 238 tankers in Vidarbha during rainy season | भर पावसाळ्यात विदर्भात २३८ टँकरने पाणीपुरवठा

भर पावसाळ्यात विदर्भात २३८ टँकरने पाणीपुरवठा

Next

अमरावती : यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात विभागात पावसाने सरासरी पार केली असली तरी अद्यापही संततधार नसल्याने भूजल पुनर्भरण झालेले नाही. जलप्रकल्पांमध्येही सरासरी २० टक्केच साठा आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत २३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत २०२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात २२५ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ११० आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी २८.८ आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १९९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना २१३.६ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात १८० मिमी पाऊस अपेक्षित असताना २४४.२ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळमध्ये पावसाची २३५.४ मिमी सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात २२९.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात १८१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, विभागातील सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात २१३.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, विभागातील सर्वात जास्त ३३३ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५६ आहे.
बंगालच्या उपसागरात ९ ते ११ व १३ ते १५ जुलै या दरम्यान कमी दाबाचे दोन टप्पे अथवा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसानेही या आठवड्यात ६२ टँकर कमी झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
 
बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टँकर
अमरावती विभागात सद्यस्थितीत ३७ तालुक्यांतील २६० गावांमध्ये २३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८८ गावांमध्ये ९१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ७३ गावांत ६३, अकोला जिल्ह्यात ५७ गावांमध्ये ४२, वाशिम जिल्ह्यात २३ गावांमध्ये २१, तर अमरावती जिल्ह्यात १९ गावांमध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
 
 ४८५ प्रकल्पांमध्ये २१ टक्केच जलसाठा 
 विभागातील ४८५ जलप्रकल्पांमध्ये सध्या २१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, परिस्थिती फारच भीषण आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये २५.१८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये २३.०९ टक्के, तर ४५२ लघु प्रकल्पांमध्ये १४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे.

Web Title: Water supply to 238 tankers in Vidarbha during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.