विदर्भाचा सावजी, वऱ्हाडी  तडका : महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:18 AM2017-12-22T00:18:05+5:302017-12-22T00:22:30+5:30

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या नागपूरकर आणि हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या लोकांच्या जिभेला पाणी सोडत आहे.

Vidarbha's Savji, Varhadi Tadka: The Eaters Crowd at the Maharashtra Food Festival | विदर्भाचा सावजी, वऱ्हाडी  तडका : महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी

विदर्भाचा सावजी, वऱ्हाडी  तडका : महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी

Next
ठळक मुद्देचुलीवरचे जेवण, पापलेट अन् खान्देशी हुरडा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मराठवाड्याचे खास वैशिष्ट्य असलेले चुलीवरचे व्हेज-नॉनव्हेज जेवण अनुभवायचेय, कोकण-मालवणच्या सुरमई, बोंबील व पापलेटवर यथेच्छ ताव मारायचाय आणि खान्देशमधील ज्वारीच्या हुरड्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलच्या खाद्य महोत्सवाला नक्कीच भेट द्या; सोबतच नागपुरात खवय्यांची खास आवड असलेले वऱ्हाडी थाट आणि सावजी भोजनाची लज्जतही घ्यायला मिळेल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या नागपूरकर आणि हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या लोकांच्या जिभेला पाणी सोडत आहे.
महाराष्ट्र त दर १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर भाषेचा लहेजा बदलतो तशी भोजनाचा प्रकारही बदलतो. नागपूर-विदर्भाचे वऱ्हाडी व सावजी भोजन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे कुठूनही नागपुरात आलेला माणूस जेवणासाठी सावजी जेवणाची मागणी करतोच. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कुणाच्याही जिभेला पाणी सोडतो. कोकण-रत्नागिरीकडचे जेवण, खान्देश, मराठवाड्याच्या भोजनाची लज्जतही अशीच वेगळी आहे. या सर्व खाद्य संस्कृतीचे दर्शन एका छताखाली खवय्यांना होत आहे.
मराठवाड्याकडच्या माणसांना व्हेजमध्ये शेवगा मसाला व नॉनव्हेजमध्ये मटन व चिकन ठेच्याची खास आवड. सोबत ज्वारी, बाजरी आणि तिळाची भाकरही त्यांना हवी असतेच. असे सर्व पण चुलीवर तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी येथे चालून आली आहे. खान्देशचे वैशिष्ट्य असलेल्या स्टॉलवर ज्वारीचा हुरडा, तिकडेच मिळणारे खास मटन मांडे, कंदुरी मटन, जळगावकडचे वांगे भरीत आणि नागली पापडही लोकांना आकर्षित करीत आहे. पापलेट म्हटले की प्रत्येकाला कोकणची आठवण येते. कोकण-मालवणची खास लज्जत घडविणारे स्टॉल येथे आहेत. सुरमई, बांगडा, बोंबील आदी माशांचे जेवण, झिंग्याचे वडे, खास वांगे आणि झिंगामिश्रित मसाला नक्कीच पोटाची भूक वाढविणार नाही तर नवल. यामध्ये वऱ्हाडी आणि सावजीचा तडका जोडलेला आहे, हे विसरू नका. येथे असलेले काही स्टॉल खास वऱ्हाडी जेवणाचे वैशिष्ट्य दर्शविणारे आहेत. मानकामाय महिला बचत गटाच्या स्टॉलवर सावजीचा रस्सा जिभेला पाणी सोडतो. शाकाहार आवडणाऱ्यांसाठीही येथे लज्जतदार भोजनाची कमी नाही.
महोत्सवामध्ये आईसक्रीम आणि गोड पदार्थांचे इतरही स्टॉल आहेत. फास्ट फूडला पर्याय म्हणून पाठकांचे खास वऱ्हाडी टच असलेले देशी फास्ट फूडही लोकांना आकर्षित करणारे आहेत. अनेक प्रकारच्या भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळत असल्याने नागपूरकरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. महोत्सव २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, उपाध्यक्ष कुंदाताई विजयकर आणि डॉ. सुधीर कुण्णावार, सचिव ज्योत्स्ना पंडित, सहसचिव देवेंद्र दस्तुरे तसेच छायाताई गाडे, विवेक मोरोणे, गीता छाडी यांचा सहभाग आणि आश्रयदाते अटलबहादूरसिंह, कांचन गडकरी, दत्ता मेघे, गिरीश गांधी व प्रभाकरराव मुंडले यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.
- सुमतीताई सुकळीकर यांना आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढणे, पाहुणचार, सरबराई करणे आवडायचे. सुदैवाने त्यांच्या आठवणीत सुरू केलेल्या आमच्या प्रतिष्ठानाला पर्यटन विभागाकडून हा महोत्सव राबविण्याची संधी मिळाली. हृदयाचा रस्ता पोटातून जातो, असे म्हणतात. या माध्यमाने   महाराष्ट्रीयन लोकांच्या पोटातून हृदयात जाण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. राज्यातील विविध भागातील खास ओळख असलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी येथे लोकांना मिळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून लोकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. २५ डिसेंबरपर्यंत महोत्सव चालणार आहे. नागपूरकरांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.
- डॉ. प्रवीण पोतदार, प्रोजेक्ट डायरेक्टर, महाराष्ट्र  फूड फेस्टिव्हल व कोषाध्यक्ष, सुमतीताई स्मृती प्रतिष्ठान.

 

Web Title: Vidarbha's Savji, Varhadi Tadka: The Eaters Crowd at the Maharashtra Food Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.