विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:47 PM2019-01-12T22:47:20+5:302019-01-12T22:48:11+5:30

विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला.

Vidarbha's resolution: Vidarbha state will get this year | विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच

विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच

Next
ठळक मुद्देविदर्भ निर्माण यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ जानेवारीपासून संपूर्ण विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा शनिवारी सीताबर्डीतील माहेश्वरी सभागृहात समारंभपूर्वक समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे देवेंद्र वानखेडे, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्यासह विदर्भवादी नेते मोरेश्वर टेंभूर्णे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, माजी आमदार यादवराव देवगडे, राम नेवले, अरुण केदार, श्रीकांत तरार, विजया धोटे, राजू नागुलवार, रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले की, निवडणुकांदरम्यान विदर्भद्रोही प्रचारही करू शकणार नाहीत, एवढी चेतना जनतेत निर्माण करू. १९८० मध्ये संपलेला विदर्भ आंदोलनाचा जलवा यंदाच्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकुमार तिरपुडे म्हणाले, ९५ टक्के लोकांना वेगळा विदर्भ हवा असला तरी राजकीय पर्याय जनतेपुढे नव्हता. विदर्भ निर्माण महामंचाकडून हा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. पदासाठी नाही तर विदर्भाचा नारा बुलंद करण्यासाठी निवडणुका लढवीत आहोत. इतरांचीही यावेळी भाषणे झाली.
प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन राजू नागुलवार यांनी केले.
लोकमत चौकात भव्य स्वागत 


दरम्यान, ११ दिवस विदर्भाचा दौरा करून बुटीबोरीमार्गे ही विदर्भ निर्माण यात्रा नागपुरात पोहोचली. अमरावती व नागपूर या दोन्ही ठिकाणांहून निघालेल्या दोन यात्रा एकत्रच नागपुरात दाखल झाल्या. यावेळी लोकमत चौकात विदर्भवाद्यांनी या यात्रेचे उत्स्फूर्तपणे ढोलताशा व फटाके फोडून स्वागत केले. यानंतर रॅलीद्वारे सभेच्या ठिकाणी नेते पोहोचले.
तुम्ही मत द्या, आम्ही विदर्भ देऊ
‘तुम्ही केवळ मत द्या, आम्ही विदर्भ देऊ’, अशी घोषणा ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. विदर्भाचे आंदोलन टोकाला नेण्यासाठीच निवडणुका लढणार असून, ही खरी परीक्षा आहे. विदर्भ मिळवू औंदा या संकल्पनेनेच येणाऱ्या निवडणुका जिंकणार आहोत. २-३ फेब्रुवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विदर्भात येत आहेत. त्यानंतर ९ फेब्रुवारीला चिटणीस पार्कवर भव्य रॅली होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने विदर्भाची ताकद दाखविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Vidarbha's resolution: Vidarbha state will get this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.