हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:46 AM2018-07-27T10:46:16+5:302018-07-27T10:49:30+5:30

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत.

Vidarbha 'Capital' of Head and Neck Cancer | हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

Next
ठळक मुद्दे२२.७ टक्के रुग्णमेडिकलमध्ये गेल्या वर्षी २४६३ नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
५० टक्के कॅन्सरला तंबाखू हे कारणीभूत ठरते. भारतात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बिडी ओढणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट ओढतात, २.७ टक्के बिडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे.

पुरुषांमध्ये ५० टक्के कॅन्सरला तंबाखू कारणीभूत
तंबाखूमुळे दरवर्षी तीन लाख भारतीयांना नव्याने मुखकर्करोग होतो. मुखकर्करोगाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. तंबाखूच्या सवयीमुळे दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक भारतीयांचा मुखकर्करोगामुळे बळी जात आहे. मध्य भारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कर्करोगाचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कर्करोग (कॅन्सर) हा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरांमुळे होतो. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुखपूर्व कर्करोग व मुखकर्करोगाच्या रुग्णांची गोळा केलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. या रुग्णालयात मागील १० वर्षांत मुखपूर्व कर्करोगाचे ६,२०० तर मुखकर्करोगाचे ९१५ रुग्णांचे निदान झाले आहे.

लवकर निदान व तात्काळ उपचार आवश्यक
डोके आणि मानेच्या कॅन्सरकडे सुरुवातीच्या काळात अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात. दुर्दैवाने सुरु वातीच्या काळात मुखकर्करोगामुळे रुग्णाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. यामुळे बहुतेक रु ग्ण कर्करोग अतिशय वाढलेल्या अवस्थेत डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे त्यांच्यावर उत्तम उपचार करूनसुद्धा क्वचितच रु ग्ण फार कमी वर्षे जगतात. लवकर निदान व तात्काळ उपचार केल्यास त्यांची आयुर्र्मर्यादा वाढू शकते.

विकत घेतलेला कॅन्सर
हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर हा मुख्यत: तंबाखू, खर्रा, गुटख्यामुळे होतो. यामुळे हा विकत घेतलेला कॅन्सर आहे. हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरमुळे अनेक रुग्णांचा जबडा, जीभ किंवा चेहऱ्याचा काही भाग काढावा लागतो. रुग्ण विद्रूप दिसतो. रुग्णाच्या जीवनावर याचा प्रभाव पडतो. या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण हे वयाच्या ५० च्या आतील असतात. परिणामी, कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा कॅन्सर टाळता येणारा आहे. यासाठी केवळ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा, गुटख्याला दूर ठेवणे गरजेचे आहे.
-डॉ. मदन कापरे
हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर तज्ज्ञ

युवकांमध्ये सर्वाधिक हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर
तंबाखू, खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात दिसून येतात. यात २५ ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. याचे वेळीच निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. तंबाखूविरोधी जनजागृती आणखी व्यापक प्रमाणात होणेही आवश्यक आहे.
-डॉ. सुशील मानधनीया, कॅन्सर तज्ज्ञ

Web Title: Vidarbha 'Capital' of Head and Neck Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.