नागपूर जिल्ह्यातील कुहीत साकारणार ‘टायगर टुरिझम पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:10 AM2018-04-11T10:10:32+5:302018-04-11T10:10:43+5:30

कुही परिसरातील सात अभयारण्यांचा उपयोग घेत एक टायगर टुरिझम पार्क साकारला जाणार आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या या सात अभयारण्यासारखी जागा नागपूर जिल्ह्यात लाभली असून त्याचाच फायदा घेत या पार्कसाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरू झाले आहेत.

'Tiger Tourism Park' will be set up in Kuhi in Nagpur district. | नागपूर जिल्ह्यातील कुहीत साकारणार ‘टायगर टुरिझम पार्क’

नागपूर जिल्ह्यातील कुहीत साकारणार ‘टायगर टुरिझम पार्क’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वेद’च्या पदाधिकाऱ्यांनी केले सादरीकरणपालकमंत्री बावनकुळेंसोबत मुंबईत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुही परिसरातील सात अभयारण्यांचा उपयोग घेत एक टायगर टुरिझम पार्क साकारला जाणार आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या या सात अभयारण्यासारखी जागा नागपूर जिल्ह्यात लाभली असून त्याचाच फायदा घेत या पार्कसाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरू झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका आहे. या संदर्भात मंगळवारी नागपूरच्या ‘वेद’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक झाली. टायगर टुरिझम पार्कचे सादरीकरण वेदचे विलास काळे, गोविंद डागा यांनी पालकमंत्र्यांसमोर सादर केले. या बैठकीला आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, एमआयडीसीचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होते.
कुहीजवळ तीन हजार एकर जागेत हा पार्क साकारला जाऊ शकतो. फिल्म सिटीपासून पर्यटकांना आवश्यक व आकर्षित करण्याऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. नागपूरपासून सुमारे ७५ किमीच्या परिसरात वाघाचे वास्तव्य असलेली सात अभयारण्य आहेत. त्यात ताडोबा, पेंच, मानसिंगदेव, उमरेड - कºहांडला, बोर, घोडाझरी, नागझिरा नवेगावचा समावेश आहे. नैसर्गिकदृष्ट्या पाहिले तर एखाद्या शहराच्या भोवती वाघांचे वास्तव्य असलेली अभयारण्ये आढळत नाही. म्हणूनच नागपूर हे टायगर टुरिझम पार्क होऊ शकते. टायगर टुरिझम पार्क झाला तर जगात नागपूरची ओळख संत्र्यांसोबत वाघांचे शहर अशी होईल. साधारणत: १५ ते २० हजार पर्यटक एकाच वेळी वास्तव्य करु शकतील अशी व्यवस्था या प्रकल्पातून होणार आहे. या प्रकल्पात ५०० एकरचा एक कृत्रिम तलावही बांधण्याचा मानस आहे. फिल्म सिटीसह नॅचरोपॅथी सेंटर, मेडिकल टुरिझम सेंटर, वृध्दाश्रम कन्व्हेंशन सेंटर, बीच अशा सर्व सुविधा पर्यटकांना उपलब्ध करण्याची व्यवस्था या प्रकल्पात आहे. या प्रकल्पातून सेझचे सर्व नियम लावण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे पर्यटकांना येथे कोणत्याच वस्तू व सेवांवर कोणताच कर लावण्यात येऊ नये असा प्रस्ताव राहील. जीएसटीही लावण्यात येऊ नये असे प्रयत्न राहतील.

पर्यटकांना सुविधा
विशेष म्हणजे पर्यटनासाठी एवढा मोठा प्रकल्प हा ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात होत असून ग्रामीण भागातील दहावी-बारावीतील तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. पर्यटकांना सर्व प्रकारच्या मनोरंजनासह येथे सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याने अन्य ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही. या टायगर टुरिझम पार्कमुळे पर्यावरणपूरक पर्यटन विकास होण्यास मदत मिळणार आहे. हा पार्क साकारल्यास आॅक्टोबर ते मार्च या काळात मोठ्या प्रमाणात जगातील पर्यटकही या पार्ककडे आकर्षित होऊ शकतात. जगातील पर्यटक विदर्भाकडे आकर्षित होतील. त्याचा फायदा विदर्भातील उद्योगांना, विविध प्रकारच्या सेवांना मिळेल. जगातील पर्यटक आले तर विदेशी चलनही मिळेल. याशिवाय गोसेखुर्द धरण आणि निसर्गरम्य आंभोरा देवस्थानचा पर्यटकांना फायदा होणार आहे. गोविंद डागा व विकास काळे या प्रकल्पासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहेत.

Web Title: 'Tiger Tourism Park' will be set up in Kuhi in Nagpur district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ