काेणत्याही समाजाची उन्नती साहित्य, सांस्कृतिक विकासावर अवलंबून - फरझाना इकबाल डांगे

By निशांत वानखेडे | Published: February 18, 2024 04:41 PM2024-02-18T16:41:03+5:302024-02-18T16:41:10+5:30

भारतीय मुस्लिम परिषद, डाॅ. मेघनाद साह सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच व छवी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयाेजन टिळक पत्रकार भवन येथे करण्यात आले.

The progress of any society depends on literature, cultural development - Farzana Iqbal Dange | काेणत्याही समाजाची उन्नती साहित्य, सांस्कृतिक विकासावर अवलंबून - फरझाना इकबाल डांगे

काेणत्याही समाजाची उन्नती साहित्य, सांस्कृतिक विकासावर अवलंबून - फरझाना इकबाल डांगे

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरदेखील मुस्लिम समाजातील लाेकांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपले याेगदान दिले. साहित्य, कला, संगीत क्षेत्रात मुस्लिमांचा सहभाग निर्विवाद हाेता व त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध केली. मात्र त्यांचे याेगदान हेतूपुरस्सरपणे दुर्लक्षिले जात आहे. यासाठी मुस्लिम समाजही दाेषी आहे. काेणत्याही समाजाची उन्नती साहित्य, नाट्य, संगीत, सांस्कृतिक विकासावर अवलंबून असते. याकडे आपल्याच समाजाने दुर्लक्ष केल्याने आज मुस्लिम समाजाला उपेक्षिले जाते, अशी खंत पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा फरझाना माे. इकबाल डांगे यांनी व्यक्त केली.

भारतीय मुस्लिम परिषद, डाॅ. मेघनाद साह सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच व छवी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयाेजन टिळक पत्रकार भवन येथे करण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरे, श्रावण देवरे, प्रा. डाॅ. युसुफ बेन्नूर, प्रा. रमेश पिसे, डाॅ. रफीक शेख, बाबाखान पठान, हाजी नासिर खान, डाॅ. असलम बारी, प्रा. शकिल अहमद, शकील पटेल, ताहीरा शेख, डाॅ. ममता मून प्रामुख्याने उपस्थित हाेते. फरझाना इकबाल म्हणाल्या, महाराष्ट्रात हजारावर मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत. दर्जेदार गझल, कविता, नाट्य, कथासंग्रह, ललित लेखन करणारे आहेत. मात्र या क्षेत्रातच त्यांची ओळख दुर्लक्षित केली जाते.

शेकडाे वर्षापूर्वी भारतात आलेल्या सुफी संतांनी समानता, एकात्मतेची वागणूक दिल्याने येथे मुस्लिम धर्माचा प्रसार झाला. लाेकांनी समतेसाठी इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र आज ही समतेची ओळख पुसून तलवारीच्या जाेरावर मुस्लिम धर्म पसरल्याचे बिंबविले जात आहे. या भारतात गंगा-जमुनी संस्कृती हाेती आणि हिंदू-मुस्लिम एकत्रित नांदत हाेते. गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचे गुरू बडे गुलाम अली खान हाेते. मात्र ही ओळख पुसून विष पसरविले आणि मुस्लिम समाजाप्रती द्वेष पसरविला जात आहे. याला उत्तर देण्यासाठी इतिहासाची पाळेमुळे खणून काढावी लागतील, सत्य मांडावे लागेल. त्यासाठी वाचन आवश्यक आहे, व्याख्यान ऐकणे आवश्यक आहे, असे आवाहन फरझाना इकबाल यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. त्यांनी तलाक व बुरख्याच्या मुद्द्यावरही बाेट ठेवले. मुस्लिमांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे व एकजूट हाेण्याचे आवाहन केले. आयाेजन समितीचे प्रा. जावेद पाशा यांनी संचालन केले. राेशनी गणवीर यांनी आभार मानले.

समाजाची मलिन प्रतिमा पुसावी लागेल : उजगरे

मुस्लिम आणि ख्रिस्ती समाज समान धाग्याने जुळले आहेत व भारतीय समाजाशी त्यांची नाळ खाेलवर रूजली आहे. मात्र गेल्या काही वर्षात चित्रपट, नाटक व साेशल मीडियातून या दाेन्ही समाजाची प्रतिमा मलिन करण्याचे सत्र सुरू आहे. ही रंगविलेली प्रतिमा पुसून टाकावी लागेल. कुणावर दहशतीचे हात उगारून हे हाेणार नाही. त्यासाठी लेखनीचे शस्त्र हाती घ्यावे लागेल. द्वेषाची भिंत पाडावी लागेल. धर्म वैयक्तिक गाेष्ट आहे, आधी माणूस व मानुसकी महत्त्वाची आहे, अशी भावना उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरे यांनी व्यक्त केली.

Web Title: The progress of any society depends on literature, cultural development - Farzana Iqbal Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर