जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक : न्या. विनय देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 09:49 PM2019-10-09T21:49:30+5:302019-10-09T21:51:03+5:30
जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे व शिस्त पाळणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे व शिस्त पाळणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी व्यक्त केले.
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत बुधवारी न्या. देशपांडे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना परिश्रम व शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले. संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी ही मुलाखत घेतली. डॉक्टर किंवा अभियंता होण्याची माझी क्षमता नव्हती. त्यामुळे आजोबा व वडिलांसारखे वकील होण्याचा निश्चय करून नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. ही पदवी परिश्रम घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. रोज १८-१९ तास अभ्यास करीत होतो. तसेच, जीवनात शिस्तीसोबत कधीच तडजोड केली नाही. शिस्तीचे धडे मला वडिलांकडून मिळाले होते. तत्पूर्वी इयत्ता दहावीमध्ये सुदैवाने चांगली शाळा व शिक्षक मिळाल्यामुळे पुढचा प्रवास सोपा झाला होता. मी अत्यंत सामान्य क्षमतेचा विद्यार्थी असल्यामुळे तो टप्पा फार महत्त्वाचा होता. त्या टप्प्यात अडकलो असतो तर, जीवनात कधीच काही बनू शकलो नसतो असे न्या. देशपांडे यांनी सांगितले.
घरात वकिलीची श्रीमंत परंपरा होती. आजोबा व वडील नावाजलेले विधिज्ञ होते. आजोबा श्रीरामपंत यांनी अंधत्व आल्यानंतरही दीर्घकाळ यशस्वी वकिली केली. वडील मनोहरपंत अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. पक्षकारांना पैसे मागण्याची कला नाही म्हणून न्यायाधीश होण्याचा सल्ला आजोबांनी त्यांना दिला होता. त्यानुसार वडील न्यायाधीश झाले होते. त्यानंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा मला स्वत:ला न्यायाधीश झाल्यावर झाला. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे न्यायाधीश म्हणून कार्य करणे सोपे झाले अशी माहिती न्या. देशपांडे यांनी दिली.
मायक्रो माईकची इच्छा पूर्ण
तरुणपणी क्रिकेटशी जवळचा संबंध होता. त्यावेळी सुनील गावसकर यांना गळ्यात लटकवलेल्या मायक्रो माईकवर बोलताना पाहून आपणही असेच बोलावे अशी इच्छा झाली होती. हायकोर्ट बार असोसिएशनने मुलाखत घेण्यासाठी गळ्यात लटकवायचा मायक्रो माईक देऊन ती इच्छा पूर्ण केली असे न्या. देशपांडे यांनी सांगितले.