नागपुरातून पळवून नेलेल्या मुलींचे तस्कर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:53 AM2018-04-26T09:53:35+5:302018-04-26T09:53:44+5:30

शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर मध्य प्रदेशात तिची सव्वालाख रुपयात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अजनी पोलिसांनी भंडाफोड करून पीडितेची सुटका केली.

The smugglers of the girls caught in Nagpur | नागपुरातून पळवून नेलेल्या मुलींचे तस्कर पकडले

नागपुरातून पळवून नेलेल्या मुलींचे तस्कर पकडले

Next
ठळक मुद्देआंतरराज्यीय टोळीचा भंडाफोडअल्पवयीन मुलीची सव्वा लाखात विक्रीपीडितेची सुटका, दोन आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर मध्य प्रदेशात तिची सव्वालाख रुपयात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अजनी पोलिसांनी भंडाफोड करून पीडितेची सुटका केली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
अटकेतील आरोपींमध्ये लता हरिदास तिजारे (४०) रा. बेलतरोडी व सागर भैरूसिंग गुर्जर (३२) रा. डबली/लक्ष्मीपुरा, ता. जिरापूर, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजनी हद्दीत राहणारी १६ वर्षाची पीडित मुलगी दहाव्या वर्गात शिकते. १६ नोव्हेंबर २०१७ ला ती घरी मोबाईलमध्ये रिचार्ज करायला जात असल्याचे सांगून निघाली, मात्र परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. अखेर आठ दिवसांनी २४ नोव्हेंबर २०१७ ला अजनी ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ क्रमांक-४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी तपासाची सूत्रे हातात घेऊन अजनी पोलिसांना निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार पीडितेचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान बेलतरोडी ठाण्यांतर्गत राहणारी लता तिजारे नावाच्या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादीच्या मुलीची मध्य प्रदेशात विक्री केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लता तिजारे हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत लता तिजारेने श्वेता शैलेष शेंडे (२०) रा. नवीन बाबुळखेडा, अजनी, राज भल्ला ऊर्फ राज गणवीर (३५) रा. रामटेकेनगर, अजनी, रितेश गवई ऊर्फ गवई काल्या (३२), रा. मित्रनगर, अजनी यांच्या मदतीने मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात जिरापूर, कालियाखेडी येथे राहणारा देवसिंग फुलसिंग गुर्जर (४०) याला पीडितेची १ लाख १५ हजारांमध्ये विक्री केल्याची कबुली दिली. या माहितीवरून उपायुक्त नीलेश भरणे यांनी पोलीस उपनिरीक्षक वाय. व्ही. इंगळे यांच्या नेतृत्वात नायक पोलीस शिपाई विजय पाटोळे, मनोज टेकाम, पोलीस शिपाई अमित धेनुसेवक, महिला पोलीस शिपाई वनिता वर्मा यांचे पथक तयार करून त्यांना पीडितेचा शोध घेण्यासाठी तत्काळ मध्य प्रदेशला रवाना केले. पथकाने मध्य प्रदेश गाठून दलाल देवसिंग गुर्जर याच्या घरावर धाड टाकली, परंतु तो फरार झाला. तेथे तपासादरम्यान देवसिंगने पीडितेची सागर भैरूसिंग गुर्जर याला विक्री केल्याचे समोर आले. हा धागा पकडून पोलिसांनी गुरुवारला सागरच्या घरावर धाड टाकली असता पीडित मुलगी आढळून आली. सागरला तत्काळ अटक करून पोलिसांनी पीडितेची त्याच्या तावडीतून सुटका केली.

पीडितेवर अत्याचार
सागरने पीडितेची खरेदी केल्यानंतर तिच्याशी अनेकदा जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच सागरचा भाऊ नारायण यानेही तिला शेतात एकटी असल्याची संधी साधत भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही. आरोपी तिला धाकात ठेवून मारहाण करीत होते तसेच तिच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. अखेर या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची ४ मेपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

आरोपी कारागृहात
या प्रकरणातील एक आरोपी रितेश गवई ऊर्फगवई काल्या हा एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत अत्याचाराचा गुन्ह्यात सध्या मध्यवर्ती नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. लवकरच त्याला प्रॉडक्शन वॅॉरंटवर ताब्यात घेण्यात येईल. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांना आरोपींचे अल्पवयीन मुलींना पळवून नेत त्यांची विक्री करणारे हे रॅकेट खूप मोठे असल्याची शंका आहे. यामुळे आरोपींनी आणखी किती मुलींची विक्री केली, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे.

Web Title: The smugglers of the girls caught in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.