धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:33 PM2019-01-15T13:33:34+5:302019-01-15T13:35:40+5:30

एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

Shocking! In two years, 12 thousand became 44 crore | धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी

धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी

Next
ठळक मुद्देश्री रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटीच्या अधिकाऱ्यांची धमाल पाच वर्षांपासून हवाला व्यावसायिकांसोबत संबंध

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटीतील अधिकाऱ्यांच्या अफरातफरीत नागपुरातील हवाला व्यावसायिक पाच वर्षांपासून सहभागी होते, हे उघड झाले आहे. या हवाला व्यावसायिकांनी आपल्या ओळखींच्या अनेकांना बँकेचे खातेधारक बनविले; नंतर याच खातेधारकांना मामा बनवून त्यांच्या खात्यातून कोट्यवधींचे ट्रान्झक्शन केले. अशातीलच एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.
मनिलॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेल्या उपरोक्त संस्थेचा माजी व्यवस्थापक मच्छिन्द्र खाडे तसेच अन्य तिघांना अंमलबजावणी
संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. असेच एक प्रकरण ज्याची गुन्हे शाखेकडे तक्रार झाली आहे, ते लोकमतच्या हाती लागले. ही तक्रार करणारा रुपेश नामक तरुण शांतिनगरात राहतो. त्याची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. हवालाच्या व्यवहारात गुंतल्याचा संशय असलेल्या विक्रम नामक तरुणाने रुपेशला दोन वर्षांपूर्वी या सोसायटीत खाते उघडण्यास बाध्य केले. माझे बचत खाते याच सोसायटीत आहे. तेथे चांगले व्याज मिळते, अशी थाप विक्रमने मारली. रुपेशने होकार देताच सोसायटीच्या एका अधिकारी व एजंटला बोलवून काही फॉर्मवर रुपेशच्या सह्या घेतल्या. त्यानंतर सोसायटीच्या एजंटस्कडे रुपेशचे पॅनकार्डच्या झेरॉक्स दिल्या. त्यानंतर रुपेश विक्रमने पाठविलेल्या एजंटकडे दर महिन्याला ५०० रुपये जमा करीत होता. दोन वर्षांत दाम दुप्पट रक्कम मिळेल, असे ठरले होते. त्यामुळे मे २०१६ मध्ये रुपेशने सोसायटीत जाऊन आपले आपले बँक स्टेटमेंट तपासले असता त्याला प्रचंड धक्का बसला. रुपेशने लोकमतला सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यातून दोन वर्षांत चक्क ४४ कोटींची उलाढाल करण्यात आली होती. एकेक व्यवहार लाखोंचा होता. ते स्टेटमेंट पाहून रुपेशला दरदरून घाम फुटला. ५०० रुपये महिन्याच्या हिशेबाने दोन वर्षांत १२ हजार रुपये जमा व्हायला हवे होते.
मात्र, रुपेशच्या खात्यात ४४ कोटींची उलाढाल अन् लाखोंची रक्कम जमा असल्याचे पाहून तो चक्रावला. तो विक्रमकडे गेला आणि याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने आपण सर्व सांभाळून घेऊ, आपले वरपर्यंत संबंध असल्याची बतावणी करून विक्रमने रुपेशला शांत केले. मात्र, त्याच्यावरून विश्वास उडाल्याने रुपेशने आपले खाते १७ मे २०१६ ला बंद केले.

... म्हणून झाली तक्रार!
विक्रम हे प्रकरण सांभाळून घेईल, असे वाटल्याने रुपेश शांत झाला. मात्र, रुपेशच्या खात्यातील कोट्यवधींची उलाढाल प्राप्तिकर खात्याच्या नजरेत आली. त्यामुळे प्राप्तिकर खात्यातून गेल्या वर्षी रुपेशला नोटीस आली. ती नोटीस घेऊन रुपेश पुन्हा विक्रमकडे गेला. आधीसारखेच थातूरमातूर उत्तर मिळत असल्याचे पाहून रुपेश घाबरला आणि त्याने २८ मे २०१८ ला पोलिसांकडे तक्रार केली. या सविस्तर तक्रारीत रुपेशने विक्रम तसेच सोसायटीत सहभागी असलेल्या घोटाळेबाजांच्या अफरातफरीची माहिती पोलिसांकडे दिली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे तपासाला आहे. रुपेशसारखेच अनेक तक्रारदार पोलिसांकडे पोहोचले. मात्र, एवढे गंभीर प्रकरण असूनही पोलिसांकडून तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याची तत्परता दाखविण्यात आली नाही.

Web Title: Shocking! In two years, 12 thousand became 44 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.