ज्येष्ठ कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे नागपुरात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:01 AM2017-12-13T11:01:42+5:302017-12-13T11:02:43+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले.

Senior Worker leader Malatitai Ruikar dies in Nagpur | ज्येष्ठ कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे नागपुरात निधन

ज्येष्ठ कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे नागपुरात निधन

googlenewsNext
ठळक मुद्देश्रमिक चळवळीचा आधारस्तंभ हरविला

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले. कामगार केसरी म्हणून नावलौकिक असलेले रामभाऊ रुईकर यांच्या त्या कन्या होत. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोपरांत देहदान करण्यात आले. त्यांच्यापश्चात भाऊ, बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रामभाऊ रुईकर यांनी श्रमिक, कामगारांच्या हक्कासाठीचा लढा आयुष्यभर चालविला. मालतीताई यांनीही वडिलांचा वसा आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासला. मालतीताई समाजकार्याची पदवी घेऊन मुंबईहून नागपूरला परतल्या, त्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी महाराष्टची स्थापना झालेली नव्हती व हा भाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरारमध्ये समाविष्ट होता. शासनाने त्यांना लेबर आॅफिसर म्हणून नियुक्ती दिली. स्वत: अविवाहित राहून त्यांनी बहीण, भावांचे शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पुढे स्वतंत्र महाराष्टत कामगार उपायुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी श्रमिक चळवळीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी हिंद मजदूर सभेची स्थापना केली. त्यावेळी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे माकप नेते भाई बर्धन आणि वसंतराव साठे यांच्याप्रमाणेच या भागात कामगारांच्या चळवळीला चालना दिली. १९९५ ला रामभाऊ रुईकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर. एस. रुईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अ‍ॅन्ड सोशियोकल्चरल स्टडीज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या या संस्थेच्या महासचिव म्हणून कार्य करीत राहिल्या. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर श्रमिक चळवळीचे काम चालविले. आठ महिन्यांपूर्वी एका अपघातामुळे त्या अंथरुणाला खिळल्या व यातून बाहेर निघणे शक्य होऊ शकले नाही.


श्रमिक संघटनेचा आधार हरविला
आर. एस. रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी मालती रुईकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीची प्रेरणा आणि संघटनेचा आधारस्तंभ हरविल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Senior Worker leader Malatitai Ruikar dies in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर