नागपूरच्या ग्रामीण भागातल्या खात येथील आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:35 AM2018-06-19T10:35:58+5:302018-06-19T10:36:11+5:30

मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते.

In the rural area of ​​Nagpur, at the Health Center is itself on 'Saline' | नागपूरच्या ग्रामीण भागातल्या खात येथील आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

नागपूरच्या ग्रामीण भागातल्या खात येथील आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कमतरतापाच उपकेंद्रातील विविध गावांचा समावेश

मंगेश तलमले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण पाच उपकेंद्रांचा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील प्रत्येक गरीब व्यक्तीना वैद्यकीय सेवेसाठी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून राहावे लागते. सध्या या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते.
डॉ. हर्षवर्धन मानेकर यांची या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळात चांगली वैद्यकीय सेवा मिळत असल्याची माहिती अनेक रुग्णांनी दिली. दोन वर्षांपूर्वी त्यांची काटोल येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून आजवर या आरोग्य केंद्रात एकही अनुभवी डॉक्टर नियुक्त करण्यात आला नाही. रात्रीला डॉक्टर हजर राहात नसल्याने नर्स रुग्णांवर औषधोपचार करते. त्यामुळे बहुतांश रुग्णांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवावे लागते. हा प्रकार आता सामान्य झाला आहे.
विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील बहुतांश गावे खात प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे अपघातातील जखमींना प्रथमोपचारासाठी खात आरोग्य केंद्रातच आणले जाते. डॉक्टरअभावी जखमींचीही गैरसोय होते. या भागातील महिलांची प्रसूती याच आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात केली जातो. याच प्रकाराचा फटका गरोदर मातांनाही सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेची जबाबदारी एकमेव कर्मचाऱ्यावर सोपविली आहे. तोही वेळेवर आरोग्य केंद्रात पोहोचत नाही. सदर आरोग्य केंद्राची आठवड्यातून एक ते दोनदा झाडझुड केली जात असून, परिसराच्या साफसफाईला कुणीही हात लावत नाही. त्यामुळे परिसरात कचरा पडल्याचे दिसून येते. येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोळ्यांचे डॉक्टर यायचे. तेही आता बंद झाले आहे. मात्र, डोळ्यांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा ओघ थांबला नाही. येथे पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. हा गंभीर प्रकार लोकप्रतिनिधींना माहिती असून, याचे कुणालाही सोयरसुतक नाही.

जैविक कचरा अस्ताव्यस्त
रुग्णालयातील औषधे व इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या, निडल्स यासह अन्य जैविक कचऱ्याची नियमाप्रमाणे योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. या आरोग्य केंद्रालगत असलेल्या एका नालीत हा जैविक कचरा टाकून जाळण्यात आला. मात्र, तो अर्धवट जळाला. हा कचरा खोल खड्ड्यात पुरणे आवश्यक असताना त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. परिणामी, हा घातक कचरा अस्तावस्त पसरत असून, त्यात इंजेक्शनच्या निडल्सदेखील आहेत. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाला जाग केव्हा येणार, हे कळायला मार्ग नाही.

रुग्णवाहिका आजारी
या आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका दिली आहे. ती १५ वर्षे जुनी असल्याने तसेच तिची योग्य देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याने ती बिघडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या आजारी असलेल्या रुग्णवाहिकेमुळे अपघातातील जखमींना किंवा प्रसूती रुग्णांना मौदा, नागपूर किंवा भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक वेळी रुग्णाला खासगी वाहनाने न्यावे लागते. त्या वाहनात मूलभूत सुविधा नसतात. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी या रुग्णवाहिकेचाच अपघात झाला होता. येथे पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची तसदीही प्रशासन घेत नाही.

Web Title: In the rural area of ​​Nagpur, at the Health Center is itself on 'Saline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य