‘पालका’ची जबाबदारी निष्ठेने बजावली

By Admin | Published: December 26, 2015 03:37 AM2015-12-26T03:37:24+5:302015-12-26T03:37:24+5:30

पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले.

The responsibility of 'Palaka' was devoted | ‘पालका’ची जबाबदारी निष्ठेने बजावली

‘पालका’ची जबाबदारी निष्ठेने बजावली

googlenewsNext

नागपूर : पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले. मिहान प्रकल्प, रस्त्यांचा विकास, धार्मिक स्थळांचा विकास, एम्स, आयआयटी, आयआयएम या सारख्या संस्थांना जागा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्याच्या पालकाची जबाबदारी निष्ठेने बजावली, असे सांगत नव्या वर्षात आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, बाजार, शेतकऱ्यांचे पांदण रस्ते, जलयुक्त शिवार अंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचा समावेश करणे व मागेल त्याला वीज कनेक्शन या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याचा संकल्प पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना आज (२६ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्ती केलेल्या पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. बावनकुळे म्हणाले, गेल्या वर्षभरात मिहान प्रकल्पासाठी १ हजार ५०८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. ७३९ कोटींची वित्तीय मान्यता दिली. भूसंपादनासाठी ८९.७२ कोटी दिले. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या विकासासाठी ४१४.६५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कामठी येथे ड्रॅगन पॅलेस परिसरात बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नॅशनल लॉ विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ६० एकर जमीन मंजूर केली. एम्ससाठी मिहानमध्ये १४३ एकर जमीन, आयआयएमसाठी मिहानमध्ये १५० एकर, आयआयटीसाठी वारंगा येथे १०० एकर जमीन मंजूर करण्यात आली. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ५० एकर जागेचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. महापालिकेला रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान मिळवून देण्यास मदत केली.
शांतिनगर, यशोधरानगर, कळमना, राणाप्रतापनगर, हुडकेश्वर व मानकापूर या सहा पोलीस ठाण्यासाठी नासुप्रकडून जागा मंजूर करण्यात आली. जिल्हा बँकेचे कर्ज वाटप बंद असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन ७५३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यात समाधान शिबिर आयोजित करून नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जून २०१६ पर्यंत नागपूर जिल्ह्यात वीज कनेक्शन नसलेला एकही कृषीपंप राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)

Web Title: The responsibility of 'Palaka' was devoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.