नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा :नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:36 PM2019-01-04T21:36:33+5:302019-01-04T21:38:04+5:30

तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत तेथील मातृभाषेबाबत अस्मिता दिसून येते. मात्र मराठी माणून मराठीचे महत्त्वच विसरतो आहे. जुन्या काळातील नाटके, संगीत, साहित्य योग्य प्रकारे नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

Reach Marathi to new generation: Nitin Gadkari | नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा :नितीन गडकरी

नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा :नितीन गडकरी

Next
ठळक मुद्दे१६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत तेथील मातृभाषेबाबत अस्मिता दिसून येते. मात्र मराठी माणून मराठीचे महत्त्वच विसरतो आहे. जुन्या काळातील नाटके, संगीत, साहित्य योग्य प्रकारे नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 


वनामती येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, संमेलनाध्यक्ष श्रीनिवास ठाणेदार, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, संमेलनाचे संयोजक गिरीश गांधी, समन्वयक शशिकांत चौधरी, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, सचिन ईटकर प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदी भाषा जोपासली पाहिजेच. मात्र मराठीचा स्वाभिमानदेखील जपण्याची आवश्यकता आहे. मराठी साहित्य, नाटक, सांस्कृतिक क्षेत्र संपन्न आहे. मात्र नवीन पिढीत याविषयी गोडी निर्माण झाली पाहिजे, असे गडकरी म्हणाले. नव्या पिढीतील दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाला वेगळे वळण दिले. आता मराठी सिनेमांसाठी मदत मागितली जात नाही. मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी केवळ सरकारची नाही. तर समाजानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
जगभरात मागील काही वर्षांत भारताची पत वाढली आहे. देशाचा महासत्ता होण्याकडे प्रवास सुरू आहे. जागतिक मराठी संमेलनातून तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल, असे मत श्रीनिवास ठाणेदार यांनी व्यक्त केले.  

गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून मराठी जागतिक संमेलनाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर विष्णू मनोहर यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचेदेखील विमोचन करण्यात आले.
अमृतभाषा मराठी ही ज्ञानभाषा व्हावी : मुख्यमंत्री 


जगभरात मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वावर विश्व उभे केले आहे. त्यांच्याकडून सामान्य मराठी तरुणाने प्रेरणा घेतली पाहिजे. मात्र माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एकविसाव्या शतकाच्या व्यवस्थेतील तत्त्व अंगिकारून मराठी भाषा अग्रेसर झाली पाहिजे. बदलत्या काळात मराठी भाषेला ज्ञानभाषा व्हावी लागेल. मराठीला ज्ञानभाषेचा प्रवासाकडे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मराठी कर्तृत्ववान व्यक्ती समाजासमोर प्रेरणावाट ठरल्या आहेत. त्यांचा आदर्श तरुणांनी समोर ठेवायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. १२ ते १५ कोटी लोक ही भाषा बोलतात. त्यामुळे भाषेला समृद्ध करण्यासाठी राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मराठीसाठी बलिदान देणाऱ्यात नागपूर शहराचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठी भाषिक प्रांतासाठी नागपूरने एका राज्याची राजधानी असतानादेखील महाराष्ट्राची उपराजधानी होण्याची तयारी दाखविली, असेदेखील ते म्हणाले.
संमेलनातून राजकीय जोडे बाहेर ठेवावे : शिंदे 

मराठी माणूस विदेशात जाऊन लाचार होत नाही. तो खडतर परिस्थितीतदेखील अस्मितेने उभा होतो व जिथे पाय ठेवतो तेथे यश मिळवितो. त्याला केवळ योग्य संधी मिळण्याची गरज असते. मराठी माणसाच्या कर्तृत्वाची जगाला ओळख झाली पाहिजे. संमेलनातून संस्कृती, भाषा, साहित्य यांचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. विविध प्रकारच्या संमेलनातून राजकीय जोडे बाहेर ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
नववीपर्यंत मराठी अनिवार्य करा : फुटाणे 

जागतिक मराठी संमेलन म्हणजे पर्यटनाचा धंदा नाही. लोकांना जातीच्या चौकटीबाहेर काढून सामाजिक दृष्टीने दिशा देण्यासाठी हे संमेलन आहे. मराठी जगविण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजाची सुद्धा आहे. महाराष्ट्रातील शाळांत नववीपर्यंत मराठी अनिवार्य व्हावे, अशी मागणी यावेळी रामदास फुटाणे यांनी केली.
मराठी संमेलनाकडे नागरिकांची पाठ 

दरम्यान, उपराजधानीत होत असलेल्या या मराठी संमेलनाकडे शहरातील नागरिकांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून आले. वनामतीचे सभागृह अर्ध्याहून अधिक रिकामे होते. मुख्यमंत्री व गडकरी यांनी यावर भाष्यदेखील केले. अगोदरच लहान असलेल्या सभागृहात लोकांची संख्या कमी आहे. अशा संमेलनांत मराठी विभाग, महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक यांना समाविष्ट करून घेतले पाहिजे, अशी सूचना गडकरी यांनी केली. तर १ वाजताच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथींनी दीड वाजता व नागरिकांनी २ वाजता येऊन नागपुरातच कार्यक्रम होत आहे, यावर शिक्कामोर्तब केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरात कार्यक्रमांना हळूहळू गर्दी होते. पुढील दोन दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात येथे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Reach Marathi to new generation: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.